काय सांगता! वडापाव अन् इडली सांबरने पर्यटक घटले; भाजप आमदाराचं अजब विधान
गोव्यात पर्यटक कमी होण्यात वडा पाव आणि इडली सांबर हे देखील एक कारण असल्याचे अजब विधान भाजप आमदार मायकल लोबो यांनी केले.

Goa News : मागील काही वर्षांपासून गोव्यात पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. गोव्याचे भाजप आमदार आणि माजी मंत्री मायकल लोबो यांनी यावर काळजी व्यक्त केली आहे. पर्यटकांची संख्या कमी होण्यात गोवा पर्यटन उद्योग जबाबदार आहे असा दावा त्यांनी केला. तसेच पर्यटक कमी होण्यात वडा पाव आणि इडली सांबर हे देखील एक कारण असल्याचे अजब विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गोव्याच्या समु्द्र किनाऱ्यावरील भागात वडा पाव आणि इडली सांबर या खाद्य पदार्थांची विक्री वाढली आहे. बंगळुरूतील काही लोक गोव्यात येऊन झोपडपट्टीत वडा पाव देत आहेत. तर काही जण इडली सांबर विक्री करत आहेत. जे खाद्य पदार्थ येथे विकायला हवेत त्यांची विक्री मात्र होत नाही. याच कारणामुळे मागील दोन वर्षांत गोव्यात पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे लोबो यांनी सांगितले.
रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील तीन वर्षांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या युद्धाचाही फटका बसला आहे. यामुळे गोव्यात पर्यटकांची संख्या कमी झाली आहे, असेही लोबो यांनी सांगितले. भाजप आमदार लोबो यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त करत राज्य पर्यटन विभाग आणि अन्य हितचिंतकांनी बैठक आयोजित करून यावर विचार करावा अशी विनंती केली आहे. गोव्यात पर्यटक येण्याचे प्रमाण का कमी झाले आहे याचा विचार करा. या परिस्थितीत जर आपण सुधारणा करू शकलो नाही तर भविष्यात पर्यटन क्षेत्रात गंभीर स्थिती निर्माण होईल असा इशाराही लोबो यांनी दिला आहे.