“वाजपेयी-अडवाणींनाही तुम्ही हेच म्हणाला असता का?” भाजप नेत्याचा पवारांना सवाल

“वाजपेयी-अडवाणींनाही तुम्ही हेच म्हणाला असता का?” भाजप नेत्याचा पवारांना सवाल

Vinod Tawde replies Sharad Pawar : शिर्डीतील भाजपच्या (BJP) राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं, अशी टीका शाह यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहा यांचा तडीपार मंत्री असा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनीही शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दोन जन्मठेपांची-काळ्यापाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? असा सवाल तावडे यांनी विचारला आहे.

“अमित शाहांची टीका जिव्हारी लागली नाही कारण..” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!

काय म्हणाले होते अमित शहा ?

शिर्डीतील अधिवेशनात बोलतांना शाह म्हणाले, शरद पवार यांनी १९७८ पासून दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं. त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला. २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिध्दांताला सोडलं होतं. दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मात्र, नंतर तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका शाह यांनी केली.

शरद पवारांचं उत्तर काय ?

गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता पवार म्हणाले, अनेक चांगले प्रशासक आणि गृहमंत्री देशाने पाहिले आहेत. आधीच्या राजकीय नेत्यांमध्ये सुसंवाद होता आता तसं दिसत नाही. जनसंघाच्या लोकांनी आमच्यासोबत काम केलं होत. परंतु, आता शिर्डीतील अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत.

देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार केलेलं नव्हतं. अमित शाह यांनी माझ्यावर केलेली टीका मला जिव्हारी लागली नाही कारण अमित शाह काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही. अमित शाह यांनी गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा त्यांनी बाळासाहेबांचा आसरा घेतला अशा शब्दांत शरद पवार यांनी अमित शाहांना प्रत्युत्तर दिलं

कराडने विचारलं रोहित कुठंय? आ. धसांनी थेट सगळचं सांगितलं

वाजपेयी-अडवाणींबद्दल हेच म्हणणार का : तावडे

भाजप नेते विनोद तावडे यांनी त्यांच्या एक्स हँडलवर शरद पवारांना काही सवाल विचारले आहेत. दोन जन्मठेपांची, काळ्यापाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते. ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले. त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे असे आव्हान तावडे यांनी दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube