“महाविकास आघाडीच गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर”; रिपोर्ट कार्ड वाचत फडणवीसांचा खोचक वार
Devendra Fadnavis on MVA : महाविकास आघाडी राज्यातले प्रकल्प, गुंतवणूक गुजरातला गेल्याचे सांगत आहेत. सारखं गुजरातचं नाव घेत आहेत. खरंतर महाविकास आघाडीवालेच गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. आमच्या सरकारने मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आणली. हे मी आकडेवारी देऊनही सांगू शकतो. महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकलंय, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारच्या दोन वर्षातील कामकााजाचं रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारच्या कामकाजाची माहिती देत फडणवीसांनी विरोधी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
Video : आमच्या योजनांना प्रचंड प्रतिसाद; विरोधक गडबडले, अजितदादांनी वाचली आरोपांची यादी
फडणवीस पुढे म्हणाले, आमच्यासाठी निवडणुकीचा शंखनाद झालाय तर काहींसाठी ऐलान झाला आहे. आज आमच्या सरकारचं दोन सव्वा दोन वर्षांतील कामकाजाचं रिपोर्ट कार्ड ठेवतोय. हे फक्त संक्षिप्त कार्ड आहे. सविस्तर कामकाजाची पुस्तिका नंतर पोहोच करू. राज्यातलं स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार आपण पाहिलं आहे. आमच्या सरकारने राज्यात परिवर्तन करणाऱ्या योजना आणल्या आहेत.
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकरी वीज निर्मिती कंपनी सुरू केली. या कंपनीमार्फत वीज निर्मिती सुरू केली. यानंतर शेतकऱ्यांना वर्षभर दिवसा वीज उपलब्ध करून देणार आहोत. यासाठी काम आम्ही सुरू केले आहे. शेतकऱ्यांना वीज आधी आठ रुपये दराने उपलब्ध होत होती. आता फक्त तीन रुपयांना वीज मिळणार आहे. याव्यतिरिक्त सरकारने मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली. शेतकऱ्यांनीही या योजनेचे स्वागत केल्याचे फडणवीस म्हणाले.
Video : एकात कार्डात मावणार नाहीत एवढी कामं; दादांनी आरोपांचा तर, शिंदेंनी वाचला प्रगतीचा पाढा
सिंचनाच्या क्षेत्रात सरकारने अभूतपूर्व काम केलं. आधीच्या मविआ सरकारने एकाही प्रकल्पाला मान्यता दिली नव्हती. आम्ही 145 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. यामुळे 22 लाख हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध होईल. नदीजोड प्रकल्प पूर्ण केला. जवळपास 55 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणलं. मराठवाड्याला दुष्काळमुक्त केलं. नगर नाशिक जिल्ह्यांतील पाण्याचे वाद मिटवले. सिंचनाच्या क्षेत्रात मोठं काम केलं.
विविध समाजांचे महामंडळ तयार केले. त्यांना पाठबळ देण्याचं काम सरकारने केलं. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामडंळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योजक केलं. आधीच्या सरकारने या महामंडळाला कुलूप लावलं होतं असे फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीला कधीच यश मिळणार नाही
मला लाडक्या बहिणींना सांगायंचय या योजनेच्या विरोधात काँग्रेस नेते कोर्टात गेले आहेत. पण त्यांना यश आलं नाही. उद्धव ठाकरेंनी तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महायुती सरकारच्या योजना बंद करणार हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. स्थगिती सरकार आणून राज्याला कुलूपबंद करण्याचा यांचा प्रयत्न आहे तो यशस्वी होणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. पण ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला. ह्यांनी पैसे घेऊन बदल्या गेल्या. उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवले. कोरोना काळात पत्रकारांना घरातून बाहेर काढून जेलमध्ये टाकलं ते आता कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.