कुणाल कामराचा पाय खोलात! ‘त्या’ अँगलने पोलिसांनी तपास केला सुरू; समनही बजावलं

Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) केलेल्या गाण्यांवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील टिप्पणीवरून राजकारण तापलं. कारवाई करत बीएमसीने इमारतीचे (द हॅबिटॅट) बेकायदेशीर भाग पाडण्यास सुरुवात केली. या वक्तव्यावर कुणाल कामराने माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, कुणाल कामराने भूमिका मांडत माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर कुणाल कामराला फोनवरून धमक्या दिल्या जात असल्याची माहितीही सूत्रांकडून समोर आली आहे. यातच आता कामराच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पोलिसांनी समन्स जारी करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कुणाल कामरानं एक विडंबन गीत सादर केलं होतं. यात त्याने एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नव्हतं. मात्र त्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्यावरच असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला. कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुणाल कामरावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
माणिकराव कोकाटेंचा पाय खोलात! नाशिक बँकेने नोटीसच धाडली; नेमकं काय घडलं
यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत हा प्रकार म्हणजे सुपारी घेण्यासारखाच आहे असे म्हटले होते. यानंतर कुणाल कामरा नरमेल असे वाटत होते. परंतु, त्याने आणखी एक व्हिडिओ जारी करून शिंदे गटाला डिवचण्याचं काम केलं. या घडामोडी घडत असतानाच या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपासही सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे.
तसेच शिंदेंवर टीका करण्यामागे खरंच काही कट होता का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यामुळे पोलिसांची पुढील तपासाची दिशा निश्चित झाली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांच्या खिल्ली उडवण्यासाठी त्याला कुणी पैसे दिले होते का किंवा अन्य मार्गांनी त्याला काही लाभ मिळाले होते का याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यामागे नक्कीच काहीतरी कट असू शकतो अशी शंका शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी व्यक्त केली.
बीएमसीचा द हॅबिटॅटवर हातोडा
महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या इमारतीत स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होत, त्या इमारतीचे बेकायदेशीर भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारी, बीएमसीने द हॅबिटॅटच्या टेरेसवरील बेकायदेशीर बांधकाम पाडले. बीएमसीची कारवाई आजही (मंगळवार) सुरूच आहे.
कुणाल कामराच्या गाण्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले?, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर