जरांगेंनी नाक दाबताच BMC आयु्क्त लागले कामाला; फोटो टाकत दिली सुविधांची माहिती

  • Written By: Published:
जरांगेंनी नाक दाबताच BMC आयु्क्त लागले कामाला; फोटो टाकत दिली सुविधांची माहिती

BMC Officers Active After Manoj Jarange Warning : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील झालेल्या गैरसोयीवरून थेट मुंबई महापालिका आयुक्तांना गर्भित इशारा दिल्यानंतर आता बीएमसी (BCM) आयुक्त लगबगीने कामाला लागल्याचे समोर आले आहे. याबाबत बीएमसीच्या एक्स हँडलवरून काही फोटो आणि माहिती टाकत आंदोलकांसाठी करण्यात आलेल्या गोष्टींची माहिती दिली आहे. या हालचालींनंतर जरांगेंनी नाक दाबाताच बीएमसी आयुक्त कामाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तुम्ही तुमचं बघा, आश्वासनं तुम्ही दिली अन् भूमिका पवारांची विचारता; आरक्षणावरून शिंदेंचा सत्ताधाऱ्यांना खोचक टोला

जरांगेंनी काय दिला होता इशारा?

आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर आता जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. पाणी आणि अन्य गोष्टी बंद करणाऱ्या आयुक्तांचे तुम्ही फक्त नाव लिहून ठेवा असे आदेश दिले होते.

बीएमसी आणि सीएसएमटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे की, शांततेने घ्या. तुम्हाला जेवायला मिळाले नाही. मुख्यमंत्री तुम्हाला पाणी मिळू देत नाहीत. कारण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त जरी झाले तरी आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचा पाणी बंद केलं. चांगल्या चांगल्यांची जिरली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होत असतो. त्यावेळेला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? असे म्हणत त्यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण आंदोलन पेटणार ?, मुंबईतील सर्व पोलिसांच्या रजा तातडीने रद्द

प्रसाधनगृहांची उभारणी अन् आझाद मैदानात खडी 

– आझाद मैदानातील मोर्चेकऱ्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरविलेल्या नागरी सेवा – सुविधा

– सततच्या पावसामुळे, आझाद मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्गावर २ ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला.

– आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.

– आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे ११ टँकर्स उपलब्ध केले आहेत. अतिरिक्त टँकर्स मागविले आहेत.

– आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी समर्पित कर्मचारी तैनात आहेत.

– वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे.

– ४ वैद्यकीय पथक आणि २ रुग्णवाहिका मैदान परिसरात २४ तास कार्यरत आहेत.

– १०८ रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध करून दिली असून, आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध.

– मैदानात आतील बाजूस एकूण २९ शौचकूप असणारे शौचालय विनामूल्य उपलब्ध.

– आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकुपे असलेली ३ फिरती शौचालये उपलब्ध.

– मेट्रो साइट शेजारी १२ फिरती (पोर्टेबल) शौचालये + अतिरिक्त शौचालयांची सोय.तसेच, फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून २५० शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरवली आहेत.

“मनोज जरांगेंची मागणी कायद्याला धरून, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण..”, उल्हास बापट नेमकं काय म्हणाले?

कोणत्याही सुविधा बंद केलेल्या नाही – BMC 

पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र २ पथके कार्यरत आहेत.इतर आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख. नजीकच्या इतर कार्यालयांमधून अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच
बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube