Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाचा छापा; झाडाझडती सुरू
Mumbai News : राज्याची राजधानी मुंबईतून एक (Mumbai) मोठी बातमी समोर येत आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने (Income Tax Raid) धाड टाकली आहे. या पथकारने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. प्रदीप शर्मा मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांना ओळख मिळाली. एका माजी आमदाराच्या प्रकरणात ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्याप्रकरणात अटक करण्यात आली होती. वर्षभरापेक्षा जास्त काळ ते तुरुंगात होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नुकताच जामीन मंजूर केला होता.
शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याबरोबरच आयटी अधिकाऱ्यांनी माजी आमदाराच्याही घराची झडती घेतली. हे प्रकरण थेट प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित नाही. माजी आमदाराच्या प्रकरणाचा तपास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मालमत्तेची पडताळणी केली जात आहे. या अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आहे का याचीही माहिती घेतली जात आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
शर्मा हे पोलिस अधिकारी दया नायक, विजय साळसकर आणि रवींद्रनाथ आंग्रे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या एन्काउंटर पथकाचे सदस्य होते. या पथकाने 300 हून अधिक गुन्हेगारांना अनेक चकमकीत ठार केले होते. साळसकर यांचा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने शर्मा यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील मुकल रोहतगी आणि राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 21 ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला होता. निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी प्रदीप शर्माला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती.