रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुट्टीला विरोध! 4 विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत रामलला प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे, तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारनेही सुट्टी जाहीर केल्यावर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात धाव घेतली, त्यावर उद्या रविवारी (21 जानेवारी) सुनावणी होणार आहे.
लाइव्ह लॉनुसार, मुंबई उच्च न्यायालयाचे (High Courts) विशेष खंडपीठ रविवारी सकाळी 10.30 वाजता या 4 विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी करणार आहे. शिवांगी अग्रवाल, सत्यजित सिद्धार्थ साळवे, वेदांत गौरव अग्रवाल आणि संदीप बंगियन अशी या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.
Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत नेमकी काय चर्चा?
महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला विरोध
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (19 जानेवारी) एक आदेश जारी करून 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे. कायद्याच्या विद्यार्थ्यांनी असा युक्तिवाद केला की कोणतेही राज्य कोणत्याही धर्माशी जोडू शकत नाही किंवा त्याचा प्रचार करू शकत नाही.
विद्यार्थ्यांनी याचिकेत काय म्हटले?
लाइव्ह लॉनुसार, याचिकेत म्हटले आहे की, “हिंदू मंदिराची प्रतिष्ठा साजरी करणे, त्यात उघडपणे सहभागी होणे आणि त्याद्वारे विशिष्ट धर्माशी संबंध जोडणे हे सरकारचे हे कृत्य धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवर थेट हल्ला आहे.”
Ayodhya Ram Mandir : रामललाच्या मूर्तीचा रंग सावळा का? जाणून घ्या त्यामागचं कारण
त्यात पुढे म्हटले आहे की, “सार्वजनिक सुट्या जाहीर करण्याबाबत कोणतेही धोरण सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाच्या इच्छांवर आधारित असू शकत नाही. एखाद्या देशभक्ताचे स्मरण करण्यासाठी किंवा एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करण्यासाठी ही सुट्टी जाहीर केली जाऊ शकते परंतु समाजातील विशिष्ट वर्गाला किंवा धार्मिक समुदायाला खूश करण्यासाठी राम ललाची प्राणप्रतिष्ठा साजरी करण्यासाठी नाही.