“..तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल”; संजय राऊतांचा थेट इशारा

“..तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल”; संजय राऊतांचा थेट इशारा

Sanjay Raut on Maharashtra Elections : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. मात्र त्याआधीच राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. मतदानानंतरच्या काही एक्झिट पोल्सने महायुती तर काही पोल्समध्ये महाविकास आघाडीला कौल राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. यामुळे दोन्हीकडील नेते मंडळी अलर्ट मोडवर आहेत. बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. या घडामोडी घडत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महायुतीचा प्लॅन बी रेडी! शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले, “गरज पडली तर..”

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार असल्याचा दावा केला. तसेच जर राज्यात आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच घेतला जाईल असे सांगितले. आता त्यांचा हा इशारा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला दिला गेला याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय मुंबईतून होईल की दिल्लीतून असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राऊत म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुंबईतच आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते सु्द्धा दिल्लीतून महाराष्ट्रात येतील. आम्ही कोणताही वेळ न घालवता आम्ही मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय घेऊ. नाहीतर भाजपाचे लोक आमच्या हातातील ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके ते निर्घृण लोक आहेत.

निकालापूर्वीच प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; मविआ-महायुतीमध्ये कोणाशी युती करणार? म्हणाले, सरकारमध्ये राहणार 

अपक्षांना कोट्यावधींची ऑफर

सरकार मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात. आमच्याबरोबर डावे पक्ष आहेत. शेकाप आहे. हे सर्व महाविकास आघाडीचे घटक आहेत. काही अपक्षांनी पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे. जे पैशांचे बंडल डोक्याखाली ठेवून झोपतात त्यांना 50-100 कोटींची ऑफर अपक्षांना केली आहे. त्यांना जिंकण्याची अपेक्षा आहे म्हणून अपक्षांना बंडलांच्या थैल्या पाठवल्या जात आहेत. भाजपाच्या जागा कशा वाढतात हे निवडणूक आयोगाने आम्हाला समजावून सांगावं, मार्गदर्शन करावं असे राऊत म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीचा भाजपाचा डाव

राष्ट्रपती राजवटी बद्दलचा हा भाजपचा डाव आहे. उद्या निकाल लागेल आणि मग 24-25 तारखेला येथे आमदार पोहोचतील बैठका होतील विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील. केंद्रीय गृह मंत्रालयात भाजपाचा कारभार असल्यामुळे आणि राजभवनात त्यांची शाखा असल्याने ते आम्हाला अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार. आमच्या हातात बहुमत आलं तरी राष्ट्रपती राजवटीचा प्रयत्न करतील, पण आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आमचे निवडून आलेले आमदार मुंबईत आणणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील नवीन निवडून आलेले आमदार मुंबईत राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube