मारकुट्या सूरज चव्हाणचं महिन्याआधीच प्रमोशन, NCP सरचिटणीसपदी नियुक्ती; दमानिया संतापल्या

मारकुट्या सूरज चव्हाणचं महिन्याआधीच प्रमोशन, NCP सरचिटणीसपदी नियुक्ती; दमानिया संतापल्या

Suraj Chavan News : विधीमंडळाच्या सभागृहात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितला आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी पत्ते फेकले म्हणूनन छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना सूरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. यानंतर मारकुट्या सूरज चव्हाणला पक्षातून तत्काळ निलंबित करण्यात आलं होतं. परंतु, त्याचं हे निलंबन काही दिवसांचंच ठरलं. कारण, आता याच सूरज चव्हाणला चक्क प्रमोशन मिळालं आहे. युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाणला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती मिळाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, अदिती तटकरे, नवाब मलिक, समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रही देण्यात आलं.

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळात रमी खेळत असतानाचा मंत्री कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कोकाटे यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. याच दरम्यान खासदार सुनील तटकरे लातुरात आले होते. येथे कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कोकाटे यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले.

हा प्रकार पाहून संतापलेल्या सूरज चव्हाणने मागचा पुढचा कोणताही विचार न कराता कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली होती. अगदी लाथाबुक्क्यांचा वर्षाव करण्यात आला. या घटनेनंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाणची तत्काळ हकालपट्टी केली होती. ही घटना 20 जुलै रोजी घडली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी चव्हाणचा राजीनामा घेतला.

सूरज चव्हाणला पक्षात कायमची नो एन्ट्री; तर, कोकाटेंचा मंगळवारी करेक्ट कार्यक्रम; अजितदादांचा शब्द

परंतु आता महिनाही उलटत नाही तोच सूरज चव्हाणचे राजकीय पुनर्वसनही करण्यात आलं. त्याला थेट प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. विशेष म्हणजे खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सूरज चव्हाणला नियुक्तीपत्र देण्यात आले. या घडामोडीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कारवाई नावापुरतीच का?, दमानियांचा संताप

युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून आता थेट पक्षाचे सरचिटणीस पद ? छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिले. आता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. हेच का महाराष्ट्राचे ‘Good Governance?’ मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात? छान!

पण, कमालीची बाब म्हणजे अगदी दोन आठवड्यांपूर्वी मी केलेल्या मानहानीच्या दाव्यात ह्याच राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण हे आमचे पदाधिकारी नाहीत ते कार्यालयात येत नाहीत असे कोर्टाला लिहून दिले आहे. मग असे अचानक काय झाले? काही महिन्यांपूर्वी ह्याच पक्षाने जनसन्मान यात्रा काढली होती. दिसला का ह्यांचा जनसन्मान? असा संताप अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.

रोहित पवारांची खरमरीत पोस्ट

दरम्यान, या घडामोडीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खरमरीत पोस्ट केली आहे. लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता. परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो.

‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं. नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube