एकीची वज्रमूठ कागदावरच! ठाकरेंचे 3 खासदार शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला; डिनर पॉलिटिक्सची तुफान चर्चा

एकीची वज्रमूठ कागदावरच! ठाकरेंचे 3 खासदार शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला; डिनर पॉलिटिक्सची तुफान चर्चा

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटात चांगलंच शीतयुद्ध सुरू आहे. ठाकरे गटाला गळती तर लागली आहेच पण मविआतीलच घटक पक्षांकडून डिवचलं जात आहे. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. हा सत्कार ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला. खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांनी थेट शरद पवार यांच्यावरच टीका केली.  शिंदे गटालाही फैलावर घेतलं. इथपर्यंतचं राजकारण लक्षात येतं. पण, आता याच राजकारणात अशी घटना घडली आहे ज्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरे आणि राऊत ज्या एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवतात. त्यांच्या पक्षाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला चक्क ठाकरे गटाचे खासदार हजेरी लावतात. होय हे खरं आहे. शिंदे गटाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमास ठाकरे गटाचे तीन खासदार उपस्थित होते. खरंतर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी स्नेहभोजन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार संजय (बंडू) जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.

आम्ही महाराष्ट्र लुटणाऱ्यांचं, कुटुंब फोडणाऱ्यांचं कौतुक कधीच केलं नाही.. आदित्य ठाकरेंचा पवारांना टोला

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे खासदार लवकरच फुटणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तातडीने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेस लोकसभेतील आठ खासदार उपस्थित होते. संजय दिना पाटील गैरहजर होते. यावेळी अरविंद सावंत यांनी टायगर अभी जिंदा है, आमची एकीची वज्रमूठ आहे असे सांगितले होते.

आता त्यांच्या या घोषणा कागदावरच राहिल्याचे सिद्ध झाले आहे. कारण याच आठ खासदारांतील तीन खासदार चक्क शिंदे गटाच्या खासदारच्या स्नेहभोजनाला हजर होते. या राजकारणाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आजच माजी आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या धक्क्यातून सावरत असतानाच शिंदे गटाचं डिनर पॉलिटिक्स समोर आले आहे. दोन्ही गटांतील राजकीय वैर सर्वश्रुत असताना ठाकरे गटातील या तीन खासदारांनी स्नेहभोजनाला हजेरी लावली तरी कशी, पडद्यामागे काही वेगळ्या घडामोडी घडत आहेत का या प्रश्नांचं उत्तर थोड्याच दिवसांत मिळेल.

शिंदेंच किंगमेकर! सामंत बंधू अन् साळवीत घडवला समेट; पडद्यामागची स्टोरी काय?

दरम्यान, दिल्लीत अधिवेशनाच्या निमित्ताने आल्यावर राज्यातील सर्व खासदार राजकीय भेदाभेद, पक्ष विसरून एकत्र येतात. त्याच प्रकारे ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झाली. मात्र जुने सहकारी खासदार एकत्र असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र सकाळीच संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली असताना नंतर त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला जाणे कितपत योग्य आहे असा सवाल आता विचारला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube