Mumbai : सावधान! 1700 कोटीचा पूल क्षणात पाण्यात घालणारा कंत्राटदार मुंबईतही करतोय तीन कामं
मुंबई : बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी (4 जून) एक निर्माणाधीन पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं सांगितलं. त्याचवेळी त्यांनी हा पूल वर्षभरात दोनवेळा पडला असल्याचीही कबुली दिली होती. त्यामुळे कंत्राटदाराच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. (Under construction Aguwani-Sultanganj bridge in Bihar’s Bhagalpur collapses recently, The contractor is also working in Mumbai)
अशातच आता या पूलाचे बांधकाम करणाऱ्या एस. पी. सिंगला महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत कंत्राट मिळाली असल्याची मोठी गोष्ट समोर आली आहे. एस.पी. सिंगला कन्स्ट्रक्शन कंपनीला गोरेगाव उड्डाणपूल, मुलुंड खिंडीपाडा आणि रत्नागिरी हॉटेल चौक येथील प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहेत, अशी माहिती आहे. जवळपास 666 कोटी रुपयांची कंत्राट मुंबई महापालिकेने या कंपनीला दिली आहेत.
#WATCH | Under construction Aguwani-Sultanganj bridge in Bihar’s Bhagalpur collapses. The moment when bridge collapsed was caught on video by locals. This is the second time the bridge has collapsed. Further details awaited.
(Source: Video shot by locals) pic.twitter.com/a44D2RVQQO
— ANI (@ANI) June 4, 2023
दरम्यान, बिहारचा पूल कोसळ्यानंतर मुंबईत या कंपनीला मिळालेली कंत्राट रद्द करावी अशी मागणी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. ते म्हणाले, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे भविष्यात मुंबईत बिहारसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने या कंपनीला तातडीने काळ्या यादीत टाकावे, असेही ते म्हणाले.
तर या पुलाच्या बांधकामावर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे काम या संबंधित कंपनीला दिले आहे. बिहारमध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढा आहे की बिहारमध्ये पूल दोनदा कोसळला आहे. आपण जो पूल या कंपनीद्वारे तयार करतोय तो मुंबई आयआयटीने डिझाईन केलेला आहे आणि सर्व डिझाइन मंजूर केलेला आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट या प्रकल्पामध्ये लावण्यात आलेला आहे जो या डिझाईननुसार काम सुरू आहे की नाही याची पाहणी करतो. त्यामुळे आपल्या पूलामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही.
संसद भवनाचा ‘तो’ फोटो पवारांना खटकला; जुन्या फोटोचा दाखला देत मोदी सरकारला फटकारलं
सध्या या पूलाच्या बांधकामाचे काम सुरुच राहणार आहे. बिहार मधील घटनेचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करू जो निष्कर्ष समोर येईल त्यानंतर पुढील निर्णय घेऊ. बातम्यांमध्ये वाचल्यानंतर आम्ही आमचा पुलाचा काम बंद करू शकत नाही. बिहार मधला पूल का पडला, याचे कारण समोर येईल आणि हा अहवाल समोर आल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू, असेही शिंदे यांनी स्पष्ट केलं.
काय झालं होतं बिहारमध्ये?
खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला होता. अवघ्या काही सेंकदातच संपूर्ण पूल गंगा नदीत विसर्जित झाला. आश्चर्याची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा काही भाग कोसळला होता. 4 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. 1717 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत होते. एप्रिलमध्ये आलेल्या वादळामुळे या बांधकामाधीन पुलाचा काही भाग खराब झाला होता.
रायगडवर अभूतपूर्व गर्दी; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, गडाचे दरवाजे बंद
बांधकामाधीन पूल कोसळल्याच्या घटनेवर विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा म्हणाले की, या घटनेुळं भ्रष्ट बिहार सरकारच्या असंवेदनशीलपणाचा आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. 2014 मध्ये 600-700 कोटी खर्चाच्या या पुलाची किंमत सुमारे 1600 कोटींवर पोहोचल्याचे ते म्हणाले. उच्च अधिकाऱ्यांनी कमिशनच्या माध्यमातून पैसे वसूल केले. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. बिहारची जनता कधीच माफ करणार नाही