४०९ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी रत्नाकर गुट्टेंविरोधात CBI ने नोंदवला एफआयआर
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार – साखर उद्योगपती रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar and Energy Limited) यांच्या विरोधात ४०९.२६ कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला आहे. याशिवाय गुट्टेंचा मुलगा आणि कुटुंबातील काही सदस्यांवरही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
रत्नाकर गुट्टे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढून जिंकली आहे.
रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड कारखान्याच्या संचालकांपैकी एक आहेत. सीबीआयचा आरोप आहे की गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडने २००८ ते २०१५ या दरम्यान युको बँकेच्या मुदत कर्ज आणि इतर पत सुविधांच्या रूपात ५७७.७६ कोटी रुपयांच्या विविध क्रेडिट सुविधा कर्जाच्या स्वरूपात घेतल्या.
सीबीआयने नुकतीच नागपुरात दोन, तर परभणीत तीन ठिकाणी गुट्टे आणि इतर आरोपींच्या घरांची झडती घेतली. गुट्टे यांच्या मुलांवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
Chinchwad byelections : कलाटेंवर कारवाई आम्ही करायची की राष्ट्रवादीने.. अहिर असे का बोलले?
दरम्यान, बॅंकेने सांगितले की, कंपनीने २०१३-१४ ते २०१६-१७ या कालावधीत साखरेच्या खरेदी-विक्रीसाठी पुरवठादारांच्या नावे युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) उघडले, ज्याची रक्कम १९७.१७ कोटी रुपये इतकी होती, असा बँकेचा आरोप आहे. एलसी अंतर्गत माल नाकारण्यात आला आणि १४३.८७ कोटी रुपयांचा खरेदी परतावा म्हणून दाखवण्यात आला, असा दावाही बँकेने केला आहे.