काँग्रेसला दणका! निवडणुकीआधी ‘आयकर’ने बँक खातीच गोठवली, पगारालाही पैसा नाही
Congress Bank Accounts Frozen : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस पार्टी आणि युवक काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आल्याचा दावा माकन यांनी पत्रकार परिषदेत केला. काल सायंकळी युवक काँग्रेसचे चार बँक खाते फ्रीज करण्यात आले. आमचे पैसे क्राउड फंडिंगद्वारे आलेले आहेत. युवक काँग्रेसचा पैसा सदस्यत्वाचा आहे असे स्पष्ट करत या देशात आता एकपक्षीय व्यवस्थाच राहणार आहे का, असा सवाल माकन यांनी केला.
या प्रकरणी आम्ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळेच आम्ही याबाबतीत प्रसारमाध्यमांना माहिती दिली नव्हती. तिथे सुनावणी झाल्यानंतर आम्ही आता प्रसारमाध्यमांना या प्रकाराची माहिती देण्यासाठी पुढे आलो आहोत. 2018 च्या आयकर रिटर्नच्या आधारे कोट्यावधी रुपयांची मागणी केली जात आहे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. 2018-19 च्या आयकर रिटर्न्सच्या आधारे 210 कोटी रुपयांची रिकव्हरी मागितली जात आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने आम्ही फक्त 30 ते 40 दिवस उशिराने पैसे जमा केले. आमच्या खासदारांनी 14 लाख 40 हजार रुपये रोख दिल्याच्या आधारे 210 कोटी रुपयांची नोटीस दिली होती.
‘पुढील मुख्यमंत्री महायुतीचाच पण, संख्याबळावर ठरणार नाही’; फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?
जर खाती गोठवायची असतील तर ते भाजपानेच करावी कारण इलेक्टोरल बाँड्सबाबत कालच न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. इलेक्टोरल बाँड्स असंवैधानिक ठरवून रद्द केले होते. यामुळे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे आता इलेक्टोरल बाँड्स वैध मानले जाऊ शकत नाहीत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेच्या नशेत मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीआधी देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसची खाती गोठवली. हा लोकशाहीला मोठा धक्का आहे. भाजपाने जमा केलेला असंवैधानिक पैसा निवडणुकीत वापरला जाईल पण, क्राउड फंडिंगच्या माध्यमातून आम्ही जमा केलेला पैसा मात्र सील केला जाईल. यासाठीच आम्ही म्हणत आहोत की भविष्यात निवडणुकाच होणार नाहीत. आम्ही आता न्यायपालिकेलाच आवाहन करत आहोत की देशातील बहुपक्षीय व्यवस्था वाचवा आणि लोकशाही सुरक्षित करा. या अन्याय आणि हुकूमशाहीविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून जोरदार लढा देऊ असा इशारा खर्गे यांनी दिला.
काँग्रेसने पक्षासाठी सर्वसामान्यांकडून देणग्यांची मागणी केली होती. यासाठी एक मोहिम सुरू करण्यात आली होती. डोनेट फॉर देश असे या मोहिमेचे नाव होते. बँक खाते गोठविण्याच्या टायमिंगवरही अजय माकन यांनी प्रश्न उपस्थित केला. निवडणुकीची घोषणा होण्यासाठी आता फक्त एक किंवा दोन आठवडेच बाकी राहिले आहेत. याधीच बँक खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला.