जम्मू काश्मीरात ट्वि्स्ट! अब्दुल्ला सरकारमध्ये काँग्रेस नाही; बाहेरून पाठिंब्याची शक्यता
Jammu Kashmir New Omar Abdullah Govt : जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला (Jammu Kashmir Elections) बहुमत मिळालं आहे. आज उमर अब्दु्ल्ला कॅबिनेटचा शपथविधी (Omar Abdullah) सोहळा पार पडणार आहे. यावेळी दहा कॅबिनेट मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे. यावेळी इंडिया आघाडीतील अनेक (INDIA Alliance) दिग्गज नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु, या शपथविधीआधीच मोठी बातमी आली आहे. काँग्रेसने वेगळी (Congress Party) भूमिका घेतली आहे. काँग्रेसने स्पष्ट केले आहे की आज पक्षाचा एकही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार नाही. तसेच या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार सुरू आहे.
हरियाणात पुन्हा भाजप तर जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया आघाडी सरकार!
जम्मू काश्मीर काँग्रेस अध्यक्ष तारिक हमीद कर्रा कॅबिनेटमध्ये सहाभागी होऊन मंत्रिपदाची शपथ घेतील असे आधी सांगण्यात येत होते. परंतु, आता काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे की पक्षातील एकही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार नाही. तसेच या सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा विचार सुरू आहे. अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. जम्मू काश्मीर काँग्रेसचे प्रभारी भरत सिंह सोलंकी यांनी सांगितले की सध्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चा झाल्यानंतरच एखादा ठोस निर्णय घेता येईल. चर्चा पूर्ण झाली नसल्याने आज पक्षाचा एकही आमदार शपथ घेणा नाही. या सरकारमध्ये काँग्रेस सहभागी होणार की नाही याचीही चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहेत. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढली होती. काँग्रेस नव्या सरकारमध्ये सहभागी होईल असे सांगण्यात येत होते. परंतु, आज शपथविधी सोहळ्याच्या आधी काँग्रेसच्या या भूमिकेने सर्वच जणम आश्चर्यचकीत झाले आहेत.
काँग्रेसच्या या भूमिकेचा असा अर्थ काढला जात आहे की कॅबिनेट मंत्रिपदाबाबत अद्याप दोन्ही पक्षात तोडगा निघालेला नाही. अब्दुल्ला सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचाही पर्याय काँग्रेसकडे आहे. कदाचित काँग्रेस हा पर्यायही स्वीकारू शकते. कारण या निवडणुकीत काँग्रेसला विशेष काही करता आले नाही. फक्त सहा आमदार निवडून आले. दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांच्या वक्तव्यांतून दिसून येत आहे की त्यांना आता काँग्रेसची गरज नाही. अशा परिस्थितीत सरकारमध्ये सहभागी होऊन फारसा फायदा होणार नसला तर बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेस नेते घेऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.