काश्मीर खोऱ्यात पुन्हा ‘ओमर’ राज, ओमर अब्दुल्ला होणार CM; फारुक अब्दुल्लांची घोषणा
Jammu Kashmir Elections Results 2024 : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे (Jammu Kashmir Elections) निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने चांगली कामगिरी केली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स ४१ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसला सहा जागांवर आघाडी मिळाली आहे. यानंतर राज्यात काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार (Congress Party) येणार हे आता निश्चित झालं आहे. यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी मोठी घोषणा केली आहे. फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले की जम्मू काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला होतील. ओमर अब्दुल्ला याआधीही राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
जम्मू काश्मिरात ‘आप’ने खातं उघडलंच; डोडात भाजप उमेदवाराचा पराभव
आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारला असता फारुक अब्दुल्ला म्हणाले, ओमर अब्दुल्ला पुढील मुख्यमंत्री असतील. जम्मू काश्मीरमधील लोक ३७० कलम हटविण्याच्या विरोधात होते हे या निकालांवरून स्पष्ट झालं आहे. ५ ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसल्याचं या निकालांतून सिद्ध झालं आहे असे जम्मू काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी बडगाम मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी पीडीपी उमेदवार आगा सैय्यद मुंतजिर यांचा 18 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
जम्मू काश्मीरच्या 90 मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 25 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला झालं होतं. तीन टप्प्यात एकूण 63.45 टक्के मतदान झालं. यंदा नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या. तसेच मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी आणि भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढली. या निवडणुकीचे निकाल आता हाती येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस एनसी आघाडीने बहुमत पार केले आहे. तर भाजपनेही जवळपास 28 जागांवर आघाडी घेतली आहे.
Video: जम्मू काश्मीर अन् हरियाणा निवडणुकीचा आज निकाल; शिवसेना नेते संजय राऊतांचा मोठा दावा
आम आदमीनेही खात उघडलं
हरियाणात अतिशय निराशाजनक (Haryana Assembly Elections) कामगिरी करणाऱ्या दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने जम्मू काश्मिरात मात्र खातं (Jammu Kashmir Elections) उघडलं आहे. येथील निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. डोडा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भारतीय जनता पार्टीचे गजय सिंह राना यांचा जवळपास साडेचार मतांनी पराभव केला.