सर्वोच्च न्यायालयाचे ‘नीट’बाबत अहवाल देण्याचे निर्देश; परीक्षा आणि समुपदेशन रद्द नाही
NEET Exam : ‘नीट’ परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या. या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमुर्ती विक्रम नाथ आणि न्या. ए. अमानुल्ला यांच्या खंडपीठाने परीक्षेचे आयोजन करणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडून (एनटीए) अहवाल मागवला आहे. (NEET) तसंच, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) तसंच या परीक्षेनंतर घेतले जाणारे समुपदेशन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.
विद्यार्थ्यांकडून पेपरफुटीचा आरोप NEET-UG परीक्षार्थींना मोठा धक्का : परीक्षा रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
‘नीट’ परीक्षा प्रभावित झाल्याचं आम्ही मानतो. याबाबत तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, असं खंडपीठाने ‘एनटीए’ ला सुनावलं आहे. मागील ५ मे रोजी ‘नीट- यूजी’ पार पडली होती. मागील काही वर्षांपासून केवळ ३ ते ४ विद्यार्थी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण प्राप्त करत आहेत. यावेळी असंख्य विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून पेपरफुटीचा आरोप करण्यात आला होता. ‘एनटीए’ने मात्र काही परीक्षा केंद्रावर गडबड झाली असून पेपर फुटलेला नाही असा पवित्रा घेतला आहे.
न्यायालयात असंख्य याचिका
पेपर फुटीचा आणि अनियमिततेचा आरोप करत विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा रद्द करत ती नव्याने घेण्याची मागणी केलीये. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिकाही दाखल झाल्या आहेत. ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’ तसंच ‘आयुष’ अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे दिले जातात. ‘नीट’ परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून दिल्लीसह देशाच्या इतर भागांत आंदोलन सुरू आहे.
पुढील सुनावणी आता ८ जुलै रोजी
एका विशिष्ट परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. त्याबद्दल याचिकेत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अथवा श्रेणी गुण पद्धत रद्द करण्याचे निर्देश दिले जावेत असे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी आता ८ जुलै रोजी होईल असं खंडपीठाकडून सांगण्यात आलय.
विरोधक आक्रमक
‘नीट’ परीक्षेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे हा विषय मोठ्या प्रमाणात तापलाय. संसदेत हा विषय आपण लावून धरणार आहोत, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितलं होतं. तर पेपर फुटीच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटलं होतं. ‘नीट’ परीक्षेला तमिळनाडूमधूनही तीव्र विरोध सुरू आहे. ही परीक्षा सामाजिक न्याय आणि संघवादाच्या विरुद्ध असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी म्हटलं होते.