बांगलादेशकडून मर्यादित कांदा आयातीला हिरवा कंदील, देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा
व्यापाऱ्यांच्या मते, आयात मर्यादित असली तरी मागणीत वाढ होऊन कांद्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. (India) बांगलादेशने कांदा आयातीस परवानगी दिली आहे. त्यामुळं या निर्णयाचा मोठा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कांदा निर्यातदारांना होणार आहे. बांगलादेश सरकारने ७ डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात सुरू करण्याचा निर्णय घेतला.
देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी बांगलादेश सरकारने दररोज नियंत्रित पद्धतीने आयात परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दररोज ५० आयात परवाने दिले जाणार असून प्रत्येक परवान्यानुसार ३० टन कांदा आयात केला जाणार आहे. यामुळे एका दिवसाला सुमारे १५ हजार क्विंटल कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळणार असल्याची माहिती आहे.
कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा पुन्हा वेळकाढूपणा ; शेतकरी नेते अजित नवले
बांगलादेश हा भारताचा परंपरागत आणि मोठा कांदा आयातदार देश आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांदा आयात बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, पुणे, अहिल्यानगर तसेच आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारांवर त्याचा विपरीत परिणाम जाणवत होता. आता आयात मार्ग पुन्हा खुला झाल्यामुळे भारतीय कांदा व्यापाराला गती मिळेल, तसेच बाजारातील दरांना आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, आयात मर्यादित असली तरी मागणीत वाढ होऊन कांद्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. जर इतर देशांनीही भारतातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, तर कांद्याच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असे सांगत भारत दिघोळे म्हणाले, केंद्र सरकारने पुढील काळात कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी घालू नये.
निर्यात सातत्याने सुरू राहिली तर भारतीय शेतकऱ्यांचा कांदा जागतिक बाजारात पोहोचेल आणि त्याचा मोठा फायदा मिळेल. बांगलादेश सरकारने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी अर्ज केलेल्या आयातदारांनाच परवाने दिले जाणार असून बाजारातील परिस्थिती पाहून ही आयात प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे.
उन्हाळ कांद्याला यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. त्यानंतर राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी कांद्याची पिके वाया गेली, तर काही ठिकाणी जमीनच वाहून गेल्याच्या घटना घडल्या. यामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडले असून, सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशचा आयात निर्णय शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
