मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुलावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्य कार्यकारणीत मोठा बदल केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शुक्रवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार बीवाय विजयेंद्र (BY Vijayendra) यांची पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह याबाबतचे अधिकृत पत्रक जारी केले आहे. यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलंय की, बीवाय विजयेंद्र यांची नियुक्ती तत्काळ लागू होईल.
Video : ‘मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नसतो, सांगेल ते करायचे’; सत्ताधारी मंत्र्यांचा भलताच कॉन्फिडन्स
विधासनभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर भाजपने खांदेपालट केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी येडियुरप्पा यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाणारे ४७ वर्षीय विजयेंद्र यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बीवाय विजयेंद्र यांनी नलिन कुमार कटील यांची जागा घेतली आहे. 2020 मध्ये, विजयेंद्र यांना भाजपच्या कर्नाटक युनिटचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते कुशल संघटनात्मक नेते म्हणून समोर आले होते. मात्र, कर्नाटक निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी शुक्रवारी (10 नोव्हेंबर) जारी केलेल्या निवेदनानुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आमदार विजयेंद्र येडियुरप्पा यांची कर्नाटक भाजप अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तत्काळ लागू होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तेजस्वी सूर्या यांच्याकडून अभिनंदन
भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बेंगळुरू दक्षिण लोकसभा खासदार तेजस्वी सूर्या यांनी बीवाय विजयेंद्र यांना कर्नाटकचे अध्यक्ष बनवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. सूर्या यांनी ट्वीट करत लिहिलं की, विजयेंद्र त्यांच्या संघटन कौशल्य आणि नेतृत्वाखाली भाजप आणखी मजबूत होईल आणि भाजप राज्यातील जनतेचा आवाज देईल, हे निश्चित.
दरम्यान, काँग्रेसकडून पराभव झाल्यानंतर भापजकडून प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू होत्या. पक्षाकडून नवीन अध्यक्ष शोधण्यात येत होता. दरम्यान, पाच-सहा महिन्यांच्या कालावधीनंतर भाजपने विजयेंद्र येडियुरप्पा यांच्याकडे राज्यातील पक्षाची कमान सोपवली आहे. भाजप लिंगायत नेत्याकडे पक्षाची धुरा सोपवेल, असे मानले जात होते. प्रथमच बीवाय विजयेंद्र यांची या पदावर नियुक्ती करून घराणेशाहीच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे मानले जाते. मात्र, भाजपने विजयेंद्र यांच्यावर विश्वास दाखवत प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
बीएस येडियुरप्पा निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असूनही त्यांना राजकीय महत्त्व आहे. येडियुरप्पा यांचा मोठा मुलगा बीवाय राघवेंद्र हे लोकसभेचे खासदार आहेत.