‘YouTube साठी व्हिडिओचा बहाणा, पाकड्यांचा खर्च अन्..’, हेरगिरी करणाऱ्या ज्योतीची कुंडली समोर

Youtuber Jyoti Malhotra Pakistan Connection : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पकडली गेलेली प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या (Jyoti Malhotra) बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. कुणाच्याही ध्यानीमनी नसलं तरी या ज्योती मल्होत्राच्या भारतविरोधी कारवाया सुरुच होत्या. आता तिच्या या सगळ्याच कृ्त्यांचा पर्दाफाश झाला आहे. हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती पाकिस्तानी इंटेलिजन्सशी जोडली होती. तिचे सगळे दौरे पाकिस्तानी संस्था निश्चित करत होती. ज्योतीला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हमध्ये (पीआयओ) वरिष्ठ अधिकारी शाकीर उर्फ राणा शाहबाज सरळ डील करत होता. हा शाकीरच तिला वेगवेगळे टास्क देत होता.
यानंतर ज्योती तिच्या भारतातील सहकाऱ्यांच्या मदतीने टास्क पूर्ण करत होती. ज्योतीच्या मोबाइलची तपासणी करण्यात आली आहे. यातून समोर आलं आहे की ती एकाच नंबरवर वारंवार फोन करत होती. हा नंबर जट रंधावा या व्यक्तीचा होता. पोलिसांनी जेव्हा या व्यक्तीची आधिक माहिती मिळवली तेव्हा लक्षात आलं की हा जट रंधावा दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हचा वरिष्ठ अधिकारी शाकीरच आहे.
मोठी बातमी! प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोप
हिसार जिल्हा पोलीस अधीक्षक कमलजीत यांनी सांगितले की शाकीर या नावावरुन संशय निर्माण होऊ शकतो म्हणून ज्योतीने जट रंधावा या नावाने नंबर सेव केला होता. ज्योती या शाकीर नावाच्या अधिकाऱ्याबरोबर व्हॉट्सअपऐवजी स्नॅप चॅट आणि टेलिग्रॅमवर जास्त बोलत होती. याच माध्यमातून पाकिस्तानात बसून शाकीर तिला सूचना देत असायचा.
दानिशने घडवून आणली शाकीर ज्योतीची भेट
हिसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी दूतावासातील एक अधिकारी दानिशने ज्योती आणि शाकीर यांची भेट घडवून आणली होती. पाकिस्तान जाण्यासाठी ज्योतीन ज्यावेळी अर्ज केला होता तेव्हा या दोघांची भेट झाली होती. दानिशने फक्त दहा मिनिटातच तिला पाकिस्तानसाठी काम करण्यास तयार केले होते. ज्योती आधीपासूनच लक्झरीयस लाइफची शौकीन होती त्यामुळे तिने वेळ न दवडता होकार दिला.
अरमान करत होता सैन्याची हेरगिरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतीने देशातील विविध सैन्य ठिकाणांची निगराणी आणि तेथील गु्प्त माहिती एकत्र करण्याची जबाबदारी राजाका गावातील अरमानला दिली होती. पोलिसांनी या अरमानलाही अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाइलमधून फोटो, व्हिडिओ आणि अन्य आक्षेपर्ह माहिती हस्तगत केली आहे. आता पोलिसांनी अरमानचा मोबाइल आणि लॅपटॉप फॉरेन्सिक तपासासाठी पाठवून दिले आहेत.
पाक गुप्तहेराच्या प्रेमात पडत देशाशी गद्दारी; युट्यूबर ज्योती मल्होत्रा कोण ?
ज्योतीच्या लॅपटॉप मोबाइलची तपासणी
ज्योती मल्होत्राला न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांच्या कस्टडी रिमांडवर घेण्यात आले आहे. तिचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवून दिला आहे. यातून डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्योतीचा फोन आणि लॅपटॉप तपासल्यानंतर ती पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सीसाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात पोलिसांना पुरावेही मिळाले आहेत.