मुकेश अंबानींनी रचला इतिहास! ‘रिलायन्स’ बनली देशातील पहिली 20 लाख कोटींची कंपनी
Reliance Market Cap : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)यांच्यासाठी 2024 हे वर्ष खास आहे. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries)भारतात नवा विक्रम केला आहे. 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप (Market Cap)ओलांडणारी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. भारतीय शेअर बाजारातील वाढीदरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.89 टक्क्यांनी वाढून 2957.80 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
गत दोन आठवड्यांमध्ये कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅप अंदाजे 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपनं 29 जानेवारीलाच 19 लाख कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. 2024 मध्ये रिलायन्सबाबत गुंतवणुकदारांमध्ये मोठा उत्साह आहे. काही दिवसांमध्येच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने जवळपास 14 टक्क्यांची भरारी घेतली आहे.
अशोक चव्हाणांनी मागं फिरावं अन्यथा शेवटच्या लाईनमध्ये बसावं लागेल, नाना पटोलेंचा टोला
रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL)च्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरापासून वाढ होताना दिसत आहे. कंपनीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं गेल्या 12 महिन्यांमध्ये रिलायन्सचे शेअर्स जवळपास 40 टक्क्यांनी वाढले आहेत.
यामध्ये रिलायन्सची उपकंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा मोठा हातभार आहे. यादरम्यान जिओच्या मार्केट कॅपमध्ये 1.70 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने 2015 पासून गुंतवणुकदारांना मोठा परतावा करुन दिला आहे. 2014 मध्ये कंपनीचे शेअर्स 0.5 टक्क्यांनी घसरले होते. रिलायन्सने 20 लाख कोटींचा आकडा गाठून पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
त्याचबरोबर काल रिलायन्स इंडस्ट्रीजचा दबदबा हुरून इंडिया 500 यादीतही दिसून आला. कंपनीने या यादीत सलग तिसऱ्या वर्षी पहिलं स्थान मिळवलं. या यादीमध्ये TCS दुसऱ्या स्थानावर तर HDFC बँक तिसऱ्या स्थानावर होती.