मोठी बातमी! जेपी नड्डा उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार? महत्वाची अपडेट समोर…

JP Nadda : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एनडीएने (NDA) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निवडण्याचे अधिकार दिले आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी गुरुवारी ही माहिती दिली. एनडीएच्या प्रमुख नेत्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संसद भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेतला.
शरद पवारांना धक्का , आगामी निवडणुकांपूर्वी ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये
NDA authorises PM Modi, BJP president J P Nadda to pick the alliance’s Vice President candidate. pic.twitter.com/zO5NY5V4SC
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2025
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी २१ जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झाले आहे. दरम्यान, या पदासाठी एनडीएकडून जेपी नड्डा हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. एनडीएच्या संसदेतील बहुमतामुळे त्यांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.
जे.पी. नड्डा यांचा राजकीय प्रवास
जे.पी. नड्डा हे 2020 पासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि ते पंतप्रधान मोदी यांचे जवळचे सहकारी मानले जातात. ते सध्या केंद्रीय आरोग्य आणि रसायन व खते मंत्री आहेत. यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशात आमदार आणि मंत्री म्हणून काम केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.
दरम्यान, एनडीएने आपल्या उमेदवाराची निवड करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. येत्या 8 सप्टेंबर रोजी एनडीएची आणखी एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात उमेदवाराबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
एनडीएची ताकद
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण 788 खासदारांच्या मतांद्वारे होते. यापैकी एनडीएचे सध्या सुमारे 425 खासदार आहेत, जे बहुमतापेक्षा जास्त आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता खूप जास्त आहे.
कधी होणार उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक?
निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. आयोगाच्या परिपत्रकानुसार, ७ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली जाईल. तर २१ ऑगस्ट ही नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर २२ ऑगस्टपर्यंत नामांकन अर्जांची छाननी केली जाईल. तसेच २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. तर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाईल.