तामिळनाडुच्या मातब्बरांना हादरा देणारा सुपरस्टार! वाचा, विजय थलपतीचा जीवनप्रवास

शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचारविरोधी भूमिका आणि युवकांना संधी देणे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

News Photo   2026 05 04T130158.783

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि सध्या (Tamilnadu) राजकारणात सक्रिय होत असलेले जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ ‘थलपती विजय’ यांचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा नाही, तर जनतेशी घट्ट नातं निर्माण करत राजकीय नेतृत्वाकडं झेपावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. २२ जून १९७४ रोजी तामिळ नाडुच्या चेन्नई येथे जन्मलेल्या विजय यांना घरातूनच कलाक्षेत्राची परंपरा लाभली होती. आता त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात इतिहास रचला आहे. राज्याच्या राजकारात मातब्बर शक्तींना उलथवून सत्तेच्या दिशेने ते निघाले आहेत.

थलपती यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे प्रख्यात दिग्दर्शक तर आई शोभा चंद्रशेखर या पार्श्वगायिका असल्याने अभिनय आणि सिनेमाचा संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाला. बालपणी काही चित्रपटांत लहान भूमिका साकारल्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये नालाया थीरपू या चित्रपटातून नायक म्हणून पदार्पण केलं. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, अपयशातून मार्ग काढत त्यांनी सातत्य ठेवले आणि १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या पूव उनक्कागा या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला निर्णायक वळण दिले.

 NTR, MGR अन् आता विजय..रुपेरी पडद्यावरून थेट सत्तेच्या सिंहासनावर जाणारे अभिनेते !

या चित्रपटानंतर विजय यांनी मागे वळून पाहिले नाही. २००० च्या दशकात त्यांनी अॅक्शन, रोमान्स आणि सामाजिक संदेश यांचा मिलाफ असलेल्या भूमिकांमुळं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. घिल्ली मधील ऊर्जा,थूपाकी मधील देशभक्तीचा अँगल, मेर्सल मधील सामाजिक भाष्य, तसेच मास्टर्स आणि Leo यांसारख्या चित्रपटांनी त्यांना ‘बॉक्स ऑफिस किंग’ म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांच्या चाहत्यांची संख्या केवळ तामिळनाडू पुरती मर्यादित न राहता संपूर्ण भारतात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणावर वाढली.

वैयक्तिक आयुष्यात विजय यांनी १९९९ मध्ये संगीता सोर्णलिंगम यांच्याशी विवाह केला असून त्यांना दोन अपत्ये आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य तुलनेने खाजगी ठेवलं. मात्र, त्यांच्या फॅन क्लबच्या माध्यमातून त्यांनी सतत सामाजिक उपक्रम राबवले रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत, आपत्ती काळातील सहाय्य यामुळे जनतेत त्यांची ‘नायक’ ही प्रतिमा पडद्याबाहेरही दृढ झाली. याच सामाजिक भक्कम पायावर विजय यांनी २०२४ मध्ये तमिळगा वेट्री कझगम (TVK) या पक्षाची स्थापना करत अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला.

शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचारविरोधी भूमिका आणि युवकांना संधी देणे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयाकडे केवळ चित्रपट स्टारचा राजकीय प्रयोग म्हणून न पाहता, दीर्घकाळ उभारलेल्या जनाधाराचे राजकीय रूपांतर म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आगामी तामिळनाडू विधानसभा 2026 मध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे संकेत दिले होते. ते आज विजयाच्या दिशेने चालले आहेत.

एकूणच, बालकलाकारापासून संघर्ष करत पुढे आलेला अभिनेता, त्यानंतर तमिळ सिनेमाचा सुपरस्टार आणि आता स्वतःचा राजकीय पक्ष उभारणारा नेता असा थलपती विजय यांचा प्रवास हा सातत्य, लोकप्रियता आणि सामाजिक जोड यांचा संगम मानला जातो, पुढील काळात त्यांची राजकीय वाटचाल किती प्रभावी ठरते, याकडं आज केवळ त्यांच्या चाहत्यांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे.

follow us