Navya Nair : सावधान! केसांत गजरा माळताय? लाखोंचा फटका बसू शकतो…

Actress Navya Nair fined Rs 1 lakh for Gajra : केसांमध्ये गजरा माळणं… अगदी कॉमन! एका गजऱ्याची किंमत किती? दहा-वीस फार फार तर पन्नास रूपये…पण हा गजरा तुम्हाला लाखोंचा फटका देऊ शकतो, असं कधी ऐकलंय? मल्याळम अभिनेत्री नव्या नायरला ऑस्ट्रेलियात याच अनुभवाला सामोरं जावं लागलं. मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा सगळा प्रकार घडलाय.
View this post on Instagram
अभिनेत्रीला ऑस्ट्रेलियात वाईट अनुभव
अलिकडेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेली मल्याळम अभिनेत्री नव्या नायर गजऱ्यामुळे अडचणीत सापडली. बॅगेत गजरा ठेवल्याबद्दल नव्याला मोठा दंड भरावा लागला. नव्याने याबद्दल माहिती देण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या विषयावर, ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्या गोष्टींवर बंदी आहे? ते जाणून घेऊया.
नव्या नायर प्रकरण
मल्याळम अभिनेत्री नव्या नायर (Malayalam Actress Navya Nair) 6 सप्टेंबर 2025 रोजी कोचीहून सिंगापूरमार्गे मेलबर्नला (Australia) पोहोचली. ती व्हिक्टोरिया मल्याळी असोसिएशनने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती. तिच्या वडिलांनी कोची विमानतळावर तिच्यासाठी चमेली गजरा (Gajra) खरेदी केला होता. नव्याने कोचीहून सिंगापूरला जाताना केसात गजरा घातला होता. पण मेलबर्न विमानतळावर ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने तिच्या बॅगची झडती घेतली. गजरा जप्त केला. गजरा जप्त केल्यामुळे नव्याला 1,980 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 1.14 लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला.
ऑस्ट्रेलियाचे जैवसुरक्षा नियम कडक?
ऑस्ट्रेलिया हे एक बेट राष्ट्र आहे. त्याची परिसंस्था अतिशय संवेदनशील आहे. येथील सरकार आपल्या शेती, पर्यावरण आणि जैवविविधतेचे बाह्य कीटक, रोग आणि आक्रमक प्रजातींपासून संरक्षण करण्यासाठी कठोर जैवसुरक्षा नियम लागू करते. कारण हे पदार्थ कीटक, रोग आणि जैविक असंतुलन निर्माण करू शकतात.
ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्या गोष्टींवर बंदी आहे?
ऑस्ट्रेलियाच्या कृषी, वनीकरण आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या मते, ताजी फुले, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ, वनस्पती, बियाणे, फळे, भाज्या, मसाले, घाणेरडे बूट किंवा मातीशी संबंधित वस्तू आणि कोणत्याही सेंद्रिय पदार्थाची परवानगीशिवाय आणण्यास सक्त मनाई आहे. जर एखाद्या प्रवाशाने या गोष्टी आणल्या, तर प्रथम त्या जाहीर करणे आवश्यक आहे. जाहीर करण्यात अयशस्वी झाल्यास दंडाची रक्कम वाढू शकते. व्हिसा रद्द होण्याचा धोका असू शकतो.