लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; विरोधी पक्षनेते राहुल गांधीचा गंभीर आरोप

Monsoon Session Lok Sabha 2025 : आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधील (Lok Sabha) मतदार यादीच्या विषयांवर विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, प्रश्नकाळ असून आपल्याला बोलता येणार नाही असं म्हणत चर्चेला नकार दिला. त्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘प्रश्न असा आहे की संरक्षणमंत्र्यांना सभागृहात बोलण्याची परवानगी आहे, त्यांच्या लोकांना बोलण्याची परवानगी आहे, परंतु जर विरोधी पक्षातील कोणी काही बोलू इच्छित असेल तर त्याला परवानगी नाही. मी विरोधी पक्षनेता आहे, तो माझा अधिकार आहे. मला कधीही बोलण्याची परवानगी नाही असा थेट घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
नितीश कुमार अन् BJPने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं; राहुल गांधींचा हल्लाबोल
त्याचबरोबर, सध्या हा एक नवा पायंडा लोकसभेत सुरू झाला आहे असंही राहुल घांधी यावेळी म्हणाले. नियम सांगतो की जर सरकारी लोक काही बोलले तर आम्हालाही बोलायला संधी मिळाली पाहिजे. आम्हाला काही शब्द विषयांवर बोलायचे होते पण विरोधी पक्षाला तसं करण्याची परवानगी नव्हती.’ प्रियांका गांधी यांनीही राहुल गांधींना पाठिंबा दिला आणि म्हणाल्या की ‘विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना बोलण्याचा अधिकार दिला पाहिजे होता. तो त्यांनी मिळाला नाही हे योग्य नाही असंही त्या यावेळी म्हणाल्या.
प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाचे खासदार सभागृहात आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी ते करत होते. गोंधळ पाहून प्रथम सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गोंधळ सुरूच राहिला आणि लोकसभा पुन्हा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावी लागली.