निवडणुकीआधी अखिलेश यादवांना धक्का! ‘त्या’ प्रकरणात CBI ने बजावली नोटीस
Akhilesh Yadav CBI Notice : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना समन्स पाठवले आहे. सीबीआयने 160 सीआरपीसी अंतर्गत समन्स बजावण्यात आले आहे. अखिलेश यादव यांना या संदर्भात उद्या (29 फेब्रुवारी) साक्षीदार म्हणून चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. वास्तविक सीबीआयने अखिलेश यादव यांना हे समन्स पाठवलेले प्रकरण 2012 ते 2017 या काळातील खाण मंत्रालयाशी संबंधित आहे. त्यावेळी अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि खाण मंत्रालय त्यांच्याकडेच होते.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने 28 जुलै 2016 रोजी या प्रकरणात आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नवीन भाडेपट्टी आणि खाण जमिनीचे नुतनीकर आदींचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने 5 जानेवारी 2019 रोजी 12 ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यादरम्यान सीबीआयने मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त केले होते. आता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समन्स बजावण्यात आले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत आघाडी झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निवडणुकांची जोरदार तयारी करत आहेत. त्यातच आता सीबीआयने नोटीस बजावल्याने अखिलेश यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आता उद्या चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.
अखेर अखिलेश यादव भारत जोडो यात्रेत; जागावाटपाचा तिढा सुटला