मोठी बातमी! आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे; कर्जदारांचा EMI वाढणार नाही
RBI Monetary Policy : रिजर्व बँक मॉनिटरी पॉलिसी बैठकीतील निर्णयांची माहिती (RBI Monetary Policy) समोर आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत यंदाही रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट सध्या 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे. समितीच्या बैठकीत 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. सलग आठव्यांदा व्याजदर-रेपो दरात कोणताही बदल होणार नाही. हा दर 6.5 टक्क्यांवरच कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत कर्जदारांना स्वस्त दरातील कर्जासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
देशातील महागाई कमी (Inflation) होताना दिसत आहे. आजच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीतील सहापैकी चार सदस्यांनी या निर्णयाचे समर्थन केले. याआधी आरबीआयने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो रेटमध्ये बदल केले होते. मे 2020 पासून फेब्रुवारीपर्यंत व्याजदरात बदल होत राहिले. त्यानंतर मात्र व्याजदर कायम ठेवण्याचा ट्रेंड सुरू झाला. बँकेच्या या निर्णयाचा फटका कर्जदारांना बसणार आहे. होम लोन, कार लोनसह अन्य कर्जांच्या हप्त्यात कपात होण्याची शक्यता आता राहिलेली नाही. ईएमआय कमी होण्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
RBI Policy : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रेपो रेट राहणार जैसे थे; EMI वाढणार नाही
या निर्णयाबद्दल माहिती देताना गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की यावेळेसही रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बँकेने रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट 6.25 टक्के, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट 6.75 टक्के आणि बँक रेट 6.75 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. महागाईचा दर चार टक्क्यांवर आणण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत असे शक्तिकांत दास म्हणाले. आरबीआयचा अंदाज आहे की आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ चलनवाढ 4.9 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 3.8 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 4.6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4.5 टक्के राहिल.
यंदा मान्सून सामान्य राहिल्यास चालू आर्थिक वर्षात महागाई दर 4.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीत काही सुधारणा दिसून येईल असे दास यांनी स्पष्ट केले. सध्याच्या काळात अन्नधान्याच्या महागाईवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. आरबीआय एमपीसीच्या शेवटच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 7 टक्के होता. यावेळी बैठकीत जीडीपी वाढीचा अंदाज सात टक्क्यांवरुन 7.2 टक्के करण्यात आला. चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढ 7.2 टक्के राहिली तर हे सलग चौथे वर्ष असेल जेव्हा विकास दर सात टक्क्यांपेक्षा जास्त असेल.
Video : नव्या धोरणांसाठी 100 दिवस, माझ्या शपथविधीनंतर RBI कर्मचाऱ्यांना भरपूर काम : मोदी