भाजपला धक्का! दोस्ती संपली आता फक्त दुश्मनी; जुन्या मित्राचा क्लिअर मेसेज
Odisha Politics : ओडिशा राज्यात भाजपने बऱ्याच काळानंतर बिजू जनता दलाला (Lok Sabha Election) अखेर सत्तेतून बेदखल केले. विधानसभा (Odisha Politics) निवडणुकीत बहुमत मिळवलं आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा दमदार कामगिरी केली. राज्यात भाजपचे 19 खासदार निवडून आले. तस पाहिलं तर बीजेडीने (BJD) राष्ट्रीय राजकारणात नेहमीच भाजपला सहकार्य होईल अशी भूमिका घेतली. विरोधकांच्या इंडिया आघाडीत (INDIA Alliance) बीजेडी सहभागी नव्हता. संसदेतही महत्वाच्या विधेयकावेळी भाजपला पाठिंबा दिला. दोन्ही पक्षांची ही पडद्यामागची जोडी निवडणुकीत बीजेडीच्या पराभवामुळे आता फार काळ टिकणार नाही असे संकेत मिळाले आहेत.
माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा (Naveen Patnaik) पक्ष आता विधानसभा आणि लोकसभेत भाजपच्या विरोधात आवाज उठवताना दिसणार आहे. पक्षाच्या आमदार आणि खासदारांना हे मेसेज पटनायक यांनी दिला आहे. पटनायक यांनी सोमवारी पक्षाच्या नऊ खासदारांची बैठक घेतली. 27 जून पासून सुरू होणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनात मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावा, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. राज्याच्या हिताशी निगडित मुद्दे चांगल्या पद्धतीने मांडा असेही त्यांनी खासदारांना सांगितले.
Odisha Assembly Election Result: पटनायकांनी ‘ओडिशा’ गमावलं; भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
राज्यसभेतील पक्ष नेते सन्मित्र पात्रा यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की पक्षाचे खासदार फक्त मुद्दे मांडून थांबणार नाहीत तर भाजपने जर राज्याकडे दुर्लक्ष केले तर आक्रमक रूपही धारण करू असा इशारा त्यांनी दिला. ओडिशा राज्याला विशेष राज्याचा दर्जा, खराब मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि बँकांची कमी संख्या असे मुद्दे उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता भाजपला समर्थन नाही फक्त विरोध
मागील दहा वर्षांपासून कोल रॉयल्टीची मागणी केली जात आहे मात्र सरकारकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे राज्यातील जनतेचे मोठे नुकसान होत आहे आणि ते त्यांच्या हक्कापासून वंचित राहत आहेत. राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करा अशा सूचना पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी दिल्याचे पात्रा यांनी सांगितले. आगामी काळात भाजपला मुद्द्यांवर आधारीत समर्थन देणार का? असा प्रश्न विचारला असता आता भाजपला कोणतेही समर्थन नाही फक्त विरोध करू, येथून पुढे भाजपला समर्थन देण्याचा काहीच प्रश्न नाही, असा इशारा त्यांनी दिला.
BJP-BJD पडद्यामागची दोस्ती
राज्यसभेत बीजू जनता दलाचे नऊ खासदार आहेत. पण पहिल्यांदाच असं घडलं आहे की पक्षाला लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही. याआधी बीजू जनता दलाने मोदी सरकारला विविध मुद्द्यांवर लोकसभेत पाठिंबा दिला होता. इतकेच नाही तर सन 2019 आणि 2024 मध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना राज्यसभेत पोहोचण्यासाठी मदतही केली होती. या बैठकीत नवीन पटनायक म्हणाले की विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा चार जागा जास्त मिळाल्या आहेत. केंद्रातही बहुमत मिळालेले नाही अशा वेळी तुम्ही सगळे एक राहा आणि पक्षाला मजबूत करा.
लोकसभा अध्यक्षपदाचा तिढा ? नितीशकुमारांचा भाजपला पाठिंबा पण, ‘टीडीपी’ची भूमिका वेगळीच