BJP CM Face : मुख्यमंत्रिपदाचा तिढा! भाजपाचे पर्यवेक्षक मैदानात तरीही ‘पत्ते’ बंदच
BJP CM Face : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (BJP CM Face) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) आणि राजस्थानात वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनाच मुख्यमंत्री करायचं की आणखी कुणाला संधी द्यायची याचा निर्णय अजून झालेला नाही. भाजपात मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. त्यानंतर भाजपने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निर्णयामुळे तिन्ही राज्यांतील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता दिसू लागली आहे.
दुसरीकडे तेलंगाणात विजय मिळवलेल्या काँग्रेसने रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देऊन कामकाजाला सुरुवातही केली आहे. परंतु, भाजपाला तीनही राज्यात अजूनही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निश्चित करता आलेला नाही. आता हा तिढा सोडवणिण्यासाठी भाजपाने पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. राजस्थानसाठी भाजपाने राजनाथ सिंह, विनोद तावडे (Vinod Tawade) आणि सरोज पांडे यांची नियुक्ती केली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, के. लक्ष्मण, आशा लकडा यांना मध्य प्रदेश तर अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांना छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून या राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेता जाणार आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Rajasthan CM : बाबा बालकनाथ यांची माघार; स्वतःच दिली माहिती! वसुंधराराजे पुन्हा ‘बॉस’?
राजस्थानसाठी उद्या, तर मध्य प्रदेशसाठी 11 डिसेंबर रोजी या पर्यवेक्षक आणि आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे. सध्या या दोन राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वसुंधरा राजेंनी आमदारांना गोळा करून त्यांची परेड वरिष्ठांसमोर केली होती. तसेच एका माजी आमदाराने त्यांच्या मुलासह साठ आमदारांना राजेंनी एका रिसॉर्टमध्ये रोखल्याचा आरोप केला होता. मध्य प्रदेशात केंद्रातून आलेले नरेंद्र सिंह तोमर, शिवराज सिंह चौहान आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांची नावे चर्चेत आहेत. यातून कुणाला मुख्यमंत्री करायचं हा प्रश्न आहे. रविवारपर्यंत तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित होतील असे सांगण्यात येत आहे.