ब्रेकिंग! सणासुदीपूर्वी ऑनलाईन फूड महागणार; झोमॅटो-स्विगीचा मोठा निर्णय, फीमध्ये वाढ

Zomato Swiggy Increase Platform Fees : सणासुदीच्या दिवसांत ऑनलाइन जेवण मागवणाऱ्यांना आता खिशाला झटका बसणार आहे. झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनी प्लॅटफॉर्म फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो ग्राहकांना आता ऑर्डर देताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यातच 22 सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्जवर 18 टक्के जीएसटी लागू होणार असल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार आणखी वाढणार आहे.
कोणत्या कंपनीने किती वाढ केली?
स्विगीने (Swiggy) निवडक बाजारपेठांमध्ये आपला प्लॅटफॉर्म चार्ज जीएसटीसह 15 रुपये इतका ठेवला आहे. झोमॅटोने (Zomato) फी वाढवून 12.50 रुपये (जीएसटी वगळून) केली आहे. तर, मॅजिकपिनने देखील उद्योगातील वाढत्या (Online Food) ट्रेंडनुसार बदल करत शुल्क 10 रुपये प्रति ऑर्डर निश्चित केले आहे. अंदाजानुसार, जीएसटी लागू झाल्यावर झोमॅटोच्या ग्राहकांना प्रति ऑर्डर सरासरी 2 रुपये आणि स्विगीच्या ग्राहकांना (Platform Fees) सुमारे 2.6 रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसावा लागणार आहे.
मॅजिकपिनची भूमिका
मॅजिकपिनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, कंपनी आधीपासूनच आपल्या डिलिव्हरी खर्चावर 18 टक्के जीएसटी भरत आहे. त्यामुळे जीएसटीमधील नवीन बदल त्यांच्या खर्चाच्या रचनेवर परिणाम करणार नाहीत. कंपनीने सांगितले की, वापरकर्त्यांसाठी शुल्कात कोणतीही अतिरिक्त वाढ केली जाणार नाही. मॅजिकपिनचे शुल्क सध्या 10 रुपये इतके आहे, जे स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे.
वाढत्या खर्चामुळे ग्राहकांवर ताण
अलीकडील काळात प्लॅटफॉर्म फी या कंपन्यांसाठी उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिनने एकाच वेळी वाढ केलेली फी पाहता हे स्पष्ट होत आहे की, खाद्य वितरण उद्योगातील खर्च झपाट्याने वाढत आहेत. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, सोय आणि परवडणारी किंमत यांचा तोल ग्राहकांसाठी किती काळ राखता येईल?