‘पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला, आम्ही फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर..’ हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीने सांगितली आपबिती

Pahalgam Terror Attack : मंगळवारी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir Attack) पहलगाममध्ये अतिरेक्यांनी निर्दोष (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मयतांत भारतीय नौदलातील एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात फक्त 20 मिनिटांच्या अंतराने एक कुटुंब वाचले. त्यांनी या हल्ल्याची भयावहता अगदी जवळून अनुभवली. तो प्रसंग नेमका काय होता, अतिरेक्यांनी निरपराध लोकांना कसं टार्गेट केलं हा सगळाच प्रसंग त्यांनी सांगितला. मागील काही वर्षांच्या काळात काल झालेला हल्ला हा सर्वात भीषण ठरला आहे.
पहलगाम श्रीनगरपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणून पहलगाम ओळखले जाते. या हल्ल्यातून वाचलेल्या एका व्यक्तीने हल्ल्याचा प्रसंग सांगितला. ज्यावेळी आम्ही घटनास्थळावरून नुकतेच निघालो होतो त्याचवेळी हा हल्ला झाला. आम्हाला बराच वेळ गोळ्यांचा आवाज येत होता. जो तो जीव मुठीत घेऊन पळताना दिसत होता. आम्ही घटना स्थळापासून वीस मिनिटांच्या अंतरावर होतो. आम्ही मागे वळून पाहिलच नाही कारण कसेही करून आम्हाला तिथून बाहेर पडायचे होते.
दहशतवाद्यांनी धर्म विचारून पतीवर झाडल्या गोळ्या; पत्नीने सांगितला थरारक घटनाक्रम…
एक्झिट गेट खूप छोटे होते आणि येथे लोकांची मोठी गर्दी झाली होती. मी माझी पत्नी आणि मुलाच्या काळजीत होतो. माझ्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचार घेणाऱ्या महिलेने सांगितले की लोकांनी आरडाओरडा करत पळण्यास सुरुवात केली होती. लोक आम्हालाही येथून पळा असे सांगत होते. लोक मागच्या बाजूने जोरात पळत येत होते. धक्का देत होते. ते मागे वळून पाहत नव्हते. तेथे लहान मुले सुद्धा होती. या ठिकाणावरून बाहेर पडण्यात आम्हाला त्रास होत होता.
एका टुरिस्ट गाईडने एएफपीला सांगितले की गोळीबाराचा आवाज ऐकून मी या ठिकाणी आलो. काही जखमी लोकांना घोड्यावर बसवून घेऊन गेलो. काही लोक जमिनीवर पडले होते. मला वाटलं की ते बहुदा मेलेले असावेत.
महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू
या धक्कादायक घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. दिलीप डिसले, अतुल मोने असं मृत्यू झालेल्या पर्यटकांचं नाव आहे. तर या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सैन्य अन् पोलिसांच्या गणवेशात दहशतवाद्यांचा हल्ला, दोन विदेशी नागरिकांसह 27 पर्यटकांचा मृत्यू