सैन्य अन् पोलिसांच्या गणवेशात दहशतवाद्यांचा हल्ला, दोन विदेशी नागरिकांसह 27 पर्यटकांचा मृत्यू

Pahalgam Attack : पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी (22 एप्रिल) रोजी मोठा दहशवादी हल्ला झाला असून या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश असू शकतो असं देखील सांगण्यात येत आहे. मंगळवारी दुपारी पहलगामध्ये (Pahalgam Attack) तीन- चार दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवादी सैन्य आणि पोलिसांच्या गणवेशात आले होते अशी देखील माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील श्रीनगर पोहचले आहे. मात्र यापूर्वी त्यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय गृहसचिव, आयबी प्रमुख, सीआरपीएफ आणि बीएसएफ महासंचालक, उच्च लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तर जम्मू-काश्मीर पोलिसांनी सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्करासह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.
टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी घेतली
या हल्ल्याबाबत माहिती देताना जम्मू आणि काश्मीर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कर-ए-तैयबाचा एक प्रमुख दहशतवादी गट, द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण यामागे टीआरएफ आहे की लष्कर आहे की आणखी कोणी याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
Sangli Politics : सांगलीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, चार माजी आमदारांचा अजितदादांच्या पक्षात प्रवेश
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा मृत्यू
तर या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले, अतुल मोने असं मृत्यू झालेल्या पर्यटकांचं नाव आहे. तर महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहे. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.