मुख्यमंत्रीपदी निवड होताच रेखा गुप्ता यांंचा दिल्लीकरांना शब्द, ‘प्रत्येकाच्या कल्याणासाठी अन्…’

  • Written By: Published:
मुख्यमंत्रीपदी निवड होताच रेखा गुप्ता यांंचा दिल्लीकरांना शब्द, ‘प्रत्येकाच्या कल्याणासाठी अन्…’

CM Rekha Gupta : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) केंद्रीय नेतृत्व दिल्लीची कमान कोणाकडे देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. आज दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. या बैठकीत रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांच्याकडे दिल्लीची कमान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर, रेखा गुप्ता यांनी पहिली प्रतिक्रिया देत केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले आहे तसेच दिल्लीतील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

रेखा गुप्ता काय म्हणाल्या ?

माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार मानते. तुमच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने मला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा दिली आहे. मी प्रतिज्ञा करते की, मी दिल्लीतील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम करेन. दिल्लीला नवीन उंचीवर नेण्याच्या या महत्त्वपूर्ण संधीसाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. असं रेखा गुप्ता म्हणाल्या. तसेच 27 वर्षांनंतर एक नवीन अध्याय सुरू होत आहे. देशातील सर्व महिलांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजपच्या प्रत्येक वचनबद्धतेची पूर्तता करणे हे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. असं देखील त्या म्हणाल्या.

दिल्ली राज्य भाजप कार्यालयात केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत, त्यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून एकमताने निवडण्यात आले. रेखा गुप्ता दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. त्यांचा जन्म हरियाणामध्ये झाला आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून झाली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर, माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी रेखा गुप्ता यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्याची घोषणा केली.

Delhi New CM : मोठी बातमी! रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री

भाजप संसदीय मंडळाने रवी शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) आणि राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश धनकर (Om Prakash Dhankar) यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाला धक्का देत 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube