आणखी एक आनंदवार्ता! आम आदमी सुखावला; महागाई 5 महिन्यांत सर्वात कमी..
Retail Inflation : केंद्र सरकारने आयकरात मोठी सूट देऊन सर्वसामान्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर आणखी एक गुडन्यूज आली आहे. देशात मागील काही महिन्यांपासून महागाई वेगाने (Retail Inflation) वाढत चालली होती. महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात किरकोळ महागाईत घट झाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी महागाईचा अहवाल जारी केला. यंदा सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
जानेवारी महिन्यात महागाई दर 4.31 टक्क्यांवर आला. मागील पाच महिन्यात हा सर्वात कमी दर आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती (Food Inflation) स्वस्त झाल्याने किरकोळ महागाईत घट झाली आहे. याआधी डिसेंबर महिन्यात महागाई दर 5.22 टक्के इतका होता. तर मागील वर्षात याच काळात महागाई दर 5.1 टक्के इतका होता.
खाद्य महागाईत दरात घट
CPI आधारीत किरकोळ महागाई दरात घट होण्यात खाद्य महागाई दर कमी होण्याचा मोठा वाटा आहे. जानेवारी महिन्यात खाद्य महागाई 6.02 टक्के होती. डिसेंबर महिन्यात हा दर 8.39 टक्के इतका होता. मागील वर्षातील जानेवारी महिन्यात हा दर 8.3 टक्के इतका होता. आता देशात किरकोळ महागाई रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) ठरवून दिलेल्या प्रमाणाच्या जवळ आली आहे.
आयकर विधेयक 2025, कायदा झाल्यास ‘या’ मोठ्या गोष्टी बदलणार
अंदाजापेक्षा सद्यस्थिती चांगली
किरकोळ महागाईबाबत भारतीय रिजर्व बँक आणि तज्ज्ञ व्यक्तींनी जो अंदाज व्यक्त केला होता त्यापेक्षा बुधवारी जारी करण्यात आलेले आकडे कितीतरी चांगले आहेत. जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई 4.5 टक्के राहील असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत होते. मागील आठवड्यात बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत या तिमाहीसाठी महागाई दर 4.4 टक्के राहील असा अंदाज गव्हर्नर यांनी व्यक्त केला होता.
दरम्यान रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात रेपो दरात (Repo Rate) पाव टक्का कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर आता महागाईनेही दिलासा दिला आहे. महागाई दर आरबीआयच्या निश्चित केलेल्या प्रमाणाच्या जवळ आल्याने रेपो दरात आणखी एक कपात होण्याची अपेक्षा आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे.
औद्योगिक उत्पादनाचा वेग घसरला
किरकोळ महागाई अहवाल जारी केल्यानंतर सरकारने डिसेंबर 2024 मधील औद्योगिक उत्पादनाचा अहवाल जारी केला आहे. उत्पादनाचा वेग मंदावला आहे. या महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा वेग 3.2 टक्क्यांवर आला. मायनिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्राच्या सुस्त कामगिरीमुळे डिसेंबर महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनाचा ग्रोथ रेट कमी झाला आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये औद्योगिक उत्पादनाचा आकडा 4.4 टक्के होता.
Union Budget 2025 मध्ये संरक्षण क्षेत्राचे बजेट 9 टक्क्यांनी वाढले, पेन्शनवर किती खर्च?