निवडणूक पश्चिम बंगलाची अन् संजय राऊतांचं पत्र थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना
लोकशाही शेवटचे आचके देत आहे आणि डोनाल्ड ट्रॅम्प यांच्याकडून मोदींचे अभिनंदन केल्याचं कानावर येत असल्याचं राऊत म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Raut) यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिलं आहे. पश्चिम बंगालच्या निकालावर राऊतांनी संताप व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकशाही शेवटचे आचके देत आहे आणि डोनाल्ड ट्रॅम्प यांच्याकडून मोदींचे अभिनंदन केल्याचे कानावर येत असल्याचं राऊत म्हणाले. पश्चिम बंगालच्या निकालावर अनेकांनी तक्रारी आणि संशय व्यक्त केला आहे. आशावेळी बाहेरून दिलेली पावती घाईची असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले राऊत?
भारताचा एक खासदार या नात्याने मी हे पत्र लिहित आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आपण पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केल्याचं समजलं. त्याबद्दल मला काही गोष्टी मांडायच्या आहेत. ही निवडणूक एका राज्याची होती. हा भारताच्या लोकशाहीचा अंतर्गत प्रश्न आहे. अशावेळी बाहेरून दिलेली पावती घाईची आणि चुकीची वाटते. या निवडणुकीत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि त्यांच्यावर दबाव आणला गेल्याचे आरोप आहेत.
निवडणूक आयोगाने निष्पक्ष काम न करता भाजपची बाजू घेतल्याची लोकांची भावना आहे. यामुळे यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे राहिले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात तैनात केलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांमुळे लोकांमध्ये सुरक्षिततेऐवजी दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जातंय. ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी या निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या आहेत. लोकांच्या मनात असलेली ही अस्वस्थता दुर्लक्षित करून चालणार नाही, असंही ते म्हणालेत.
लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक होणं नव्हे, तर ती पारदर्शक आणि निष्पक्ष असणं महत्त्वाचं आहे. प्रक्रियेवरच जेव्हा गंभीर आरोप होतात. तेव्हा त्याचं कौतुक करण्याऐवजी चौकशी होणं गरजेचं असतं. अभिनंदनपर विधान करण्यापूर्वी आपण या गोष्टींचा विचार केला होता का? आपण लोकशाही मानणारे आहात, त्यामुळं आपण या प्रकरणाकडं अधिक गांभीर्याने आणि संतुलितपणे पाहावं, अशी मी विनंती करतो, असंही राऊत म्हणाले.