स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण! खासदार संजय सिंह यांच्याकडून घटनेचा निषेध
Swati Maliwal Assault Allegations : आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिव बिभव कुमार यांनी खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात मोठा संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
योग्य ती कारवाई करतील
याबाबत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत या घटनेबाबत निषेध व्यक्त केला. तसंच या घटनेबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लवकरच योग्य ती कारवाई करतील, असं सांगितलं. तसंच, अशा घटना कुठेही घडल्या तरी त्याबाबत योग्य ती कारवाई होण गरजेचं आहे. त्याचबरोबर अशा घटना घडत असतील तर ते दुर्दैवी आहे असंही ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले संजय सिंह?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी त्या अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी थांबल्या असता स्वीय सचिव बिभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं. या घटनेची माहिती स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना दिली होती. या घटनेचा आम्हीदेखील निषेध व्यक्त करतो असंही संजय सिंह म्हणाले. तसंच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून कारवाईचे निर्देश दिले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.