‘चौहान राज’ : मध्यप्रदेशमध्ये संपले पण भाजपमध्ये सुरु झाले!

‘चौहान राज’ : मध्यप्रदेशमध्ये संपले पण भाजपमध्ये सुरु झाले!

पाचवेळचे खासदार, सहा वेळचे आमदार अन् चार टर्मचे मुख्यमंत्री! मध्य प्रदेशमधील ‘चौहान राज’ संपल्यानंतर दीर्घ राजकीय कारकीर्द गाजवलेले शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांचे आता काय होणार? असा प्रश्न आता विचारला जात आहे. ते राज्याच्याच राजकारणात राहणार? ते केंद्राच्या राजकारणात जाणार? की संघटनेतच कोणते तरी पद देऊन त्यांना समाधानी केले जाणार? अशा प्रश्नांनी डोकं वर काढलं आहे. पण शिवराज सिंह चौहानांचा इतिहास पाहता ते सहजासहजी डाव सोडणाऱ्यातील नेते नाहीत. त्यामुळेच मध्यप्रदेशमधील चौहान राज संपले असले तरी भाजपमध्ये खऱ्या अर्थाने चौहान राज सुरु होणार आहे. ते कसे तेच आपण पाहणार आहोत. (Soon Shivraj Singh Chauhan may become the new national president of BJP)

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची कमालीची उत्सुकता होती. कारण शिवराज सिंह चौहान, रमण सिंह आणि वसुंधरा राजे यांच्यासारख्या वाजपेयी-आडवाणींच्या काळातील दिग्गज नेत्यांना ‘मोदी शाह’ पुन्हा रिपीट करणार की ते दुसरा चेहरा देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पण त्यांनी ‘दे धक्का’ पॅटर्न राबवत या तिघांनाही बाजूला केले. प्रस्थापितांच्या जागी अगदीच नवख्या आणि चर्चेत नसणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली. पण त्याचवेळी रमण सिंह यांना विधानसभेचे अध्यक्षपद देत त्यांचे पुनर्वसन केले.

दिया कुमारी होणार राजस्थानच्या उपमुख्यमंत्री, मुघलांशी आहे खास कनेक्शन

परंतु वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान यांना सगळं जिंकूनही सगळं गमावल्यासारखे वाटत आहे. ते दोघेही आता केवळ इतर आमदारांसारखेच फक्त आमदार राहिले आहेत. आत्तापर्यंत शिवराज सिंह चौगान सांगत होते की त्यांनी 2024 ची तयारी सुरू केली आहे. पण “दिल्लीत जाऊन काही मागण्यापेक्षा मी मरणे पसंत करेन”, या कालच्या पत्रकार परिषदेतील त्यांच्या वक्तव्यामुळे वेगळेच चित्र तयार होत आहे. मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे शिवराज सिंह चौहानांचा इतिहास पाहता ते सहजासहजी डाव सोडणाऱ्यातील नेते नाहीत. त्यामुळेच मध्यप्रदेशमधील चौहान राज संपले असले तरी भाजपमध्ये आता चौहान राज सुरु होणार आहे.

भाजपबाबत एक गोष्ट निश्चितपणे मान्य करायला हवी की ते कोणत्या नेत्याने संघटनेसाठी किती आणि काय काम केले, संघटना कशी मजबूत केली हे पाहतात. त्यानंतर त्या नेत्याला त्याचे बक्षीसही मिळते. यात राजस्थानमधील भजनलाल शर्मा यांचे उदाहरण सांगता येईल. कारण त्यांनी तीन दशके संघटनेत काम केले आणि आता पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर त्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.

पहिल्यांदाच आमदार अन् राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा आहेत तरी कोण?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह यांनी अथक परिश्रम घेतले, सरकारच्या माध्यमातून अभिनव योजना राबविल्या, राज्यातील शेतीची आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली. निवडणुकीत पायाला भिंगरी लावून यशस्वी प्रचार केला आणि पक्षाला रेकॉर्डब्रेक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, पण त्यानुसार त्यांना अद्याप तरी फळ मिळाले नाही. पण लवकरच शिवराज सिंह चौहान हे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात असे बोलले जात आहे. पक्षाने त्यांना राज्यात कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नाही. पण भाजप हायकमांड त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांच्याकडे पक्षाची कमान सोपविण्याची शक्यता आहे.

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ येत्या लोकसभा निवडणुकापर्यंतचा आहे. भाजपमध्ये सहसा दुसऱ्यांदा अध्यक्षपद दिले जात नाही. पण नड्डा यांना सप्टेंबर 2022 मध्ये लोकसभा निवडणुकांपर्यंतची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ आता अवघ्या चार ते पाच महिन्यांचा राहिला आहे. त्यामुळेच पाच महिन्यांनंतर नड्डा यांच्या जागी शिवराज सिंह चौहान यांच्यासारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube