शेवटच्या दिवशी शेअर मार्केट डाऊन, सेन्सेक्स, निफ्टी आपटला; गुंतवणूकदार धास्तावले

शेवटच्या दिवशी शेअर मार्केट डाऊन, सेन्सेक्स, निफ्टी आपटला; गुंतवणूकदार धास्तावले

Stock Market Today : आज 2024 या वर्षातील शेवटचा दिवस. या दिवशीही शेअर बाजारात घसरण दिसून आली. 2024 मधील शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजार घसरणीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स 404.34 अंकांनी घसरून 77,843.80 अंकांवर उघडला. तर निफ्टीत 89.60 अंकांची घसरण होऊन निफ्टी 23,554.80 अंकांवर सध्या व्यवहार करत आहे. याआधी सोमवारी शेअर बाजारात तेजी होती. परंतु, आज मात्र शेअर बाजारात सुरुवातीलाच घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही धास्तावले आहेत.

आयटी शेअर्सने केला मूड खराब

वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात आयटी क्षेत्रातील शेअर्सने बाजाराचा मूड खराब केला. आयटी शेअर्समध्ये विक्रीमुळे निफ्टीचा आयटी इंडेक्स 1000 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. तसेच बँकिंग, एफएमसीजी, मेटल्स, कंज्यूमर ड्यूरेबल्स, हेल्थकेअर, एनर्जी, मिडिया सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. फक्त फार्मा आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

अमेरिकेचा एकच निर्णय अन् शेअर मार्केट धडाम्; सेन्सेक्स आपटला, गुंतवणूकदारांत धास्ती

मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये सुद्धा घसरण झाली आहे. निफ्टीचा मिड कॅप इंडेक्स 518 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 115 अंकांची घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांचे नुकसान

वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात गुंतवणूकदारांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांना तीन लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. बीएसईवर लिस्टेड स्टॉक्सचे मार्केट कॅप 437.82 लाख कोटींपर्यंत आला आहे. मागील सेशनमध्ये 441.35 लाख कोटी रुपये राहिला होता. आजच्या सेशनमध्ये गुंतवणूकदारांना 3.53 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

‘या’ शेअर्समध्ये झाली घसरण

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 24 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. फक्त सहा शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. आजच्या सेशनमध्ये टेक महिंद्रा 2.47 टक्के, इन्फोसिस 2.45 टक्के, झोमॅटो 2.21 टक्के, टिसीएस 2.20 टक्के, एचसीएल टेक 1.49 टक्के, बजाज फायनान्स 0.98 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

शेअर बाजारातील घसरणीची कारण काय

शेअर बाजारात घसरण झाल्याची कारणेही आता समोर आली आहेत. अमेरिकन बाजारातील चढउतार हे भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं मुख्य कारण सांगितलं जात आहे. सोमवारी डाऊ जोन्स आणि नॅस्डॅकमध्ये मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका, सेन्सेक्स 1064 अंकांनी घसरला, ‘हे’ आहे कारण

परकीय गुंतवणूकदारांनी केलेली विक्री हे शेअर बाजाराच्या घसरणीचं आणखी एक कारण. परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सातत्याने पैसे काढून घेत आहेत. त्याचाही परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे.

भारतीय शेअर बाजारातील घसरणीचं आणखी एक कारण डॉलरचे मजबूत होणे आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर होत आहे. रुपया प्रति डॉलर 85 या ऐतिहासिक पातळीवर घसरला आहे. रुपया घसरल्याने विदेशी गु्ंतवणूकदारांचा नफा कमी होतो़. त्यामुळे त्यांच्याकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेतले जातात. या परिस्थितीत शेअर बाजारात घसरण दिसून येते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube