इंडिया आघाडीतील पक्षांना घराणेशाहीची चिंता, ठाकरे-पवारांचे उद्दिष्ट फक्त…; अमित शाहांची घणाघाती टीका
Amit Shah on India Alliance : आगामी काळात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. याच धरतीवर आज भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाला संबोधित करतांना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (India Alliance) जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे 7 घराणेशाही पक्षाचं गठबंधन असल्याचा आरोप त्यांनी केला. इंडिया आघाडीतील पक्षात लोकशाही नाही, त्यामुळं ते देशात लोकशाही कशी आणणार? असा सवाल शाह यांनी केला.
संविधानाविरोधात भाजप-संघ काम करतोय; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका
इंडिया अलायन्सवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, यात सहभागी असलेले सर्व पक्ष घोटाळ्यांमध्ये सामील होते.आम आदमी पक्षानेही दिल्लीत अनेक घोटाळे केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी पांडव आणि कौरवांप्रमानेच दोन छावण्या तयार झाल्या. मोदींच्या नेतृत्वाखाली पहिला कॅम्प म्हणजे एनडीए आघाडी, आपल्या आघाडीचे उद्दिष्ट प्रथम राष्ट्र आहे. तर लांगुणचालन करणारे आणि घराणेशाही जपणारे जे पक्ष आहेत, त्यांचं नेतृत्व कॉंग्रेस करतो आहे. आपण विकासाचा विचार करतो. मात्र, विरोधक आपल्या मुलाला मुख्यमंत्री कसं होता येईल, पंतप्रधान कसं होता येईल, याचा विचार करत राहतात, अशी टीका शाह यांनी केली.
इंडिया आघाडीतील पक्षांना घराणेशाहीची चिंता
शाह म्हणाले की, इंडिया आघातील पक्ष घराणेशाहीचा विचार करतात. खासदार सोनिया गांधींचे लक्ष्य राहुल गांधींना पंतप्रधान बनवणं आहे, शरद पवारांचे लक्ष्य आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवणे, ममता दिदीचं पुतण्याला मुख्यमंत्री करणं, स्टॅलिनचं लक्ष्यही मुलाला मुख्यमंत्री बनवणं आहे. उद्धव ठाकरेंचे लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणे, लालू यादव यांचे लक्ष्य आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवणं आहे. मात्र, भाजप विकासाचं राजकारण करतो. भाजप हा कुटुंबाभिमुख पक्ष असता तर चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाला नसता. पुत्रांचे कल्याण हेच ध्येय असेल तर देशाचे कल्याण कसे होणार? असा सवाल शाह यांनी केला.
शाहा म्हणाले, या देशात 2G, 3G आणि 4G पक्ष आहेत. 2G हा घोटाळा नाही. 2G हा 2 पिढ्यांचा पक्ष आहे… त्यांचा नेता 4 पिढ्या बदलत नाही… कोणी पुढे सरकले तर याचा त्रास त्यांना होता, अशी टीकाही शाह यांनी केली.
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार
गेल्या 75 वर्षांत देशाने 17 लोकसभा निवडणुका, 22 सरकारे आणि 15 पंतप्रधान पाहिले आहेत. त्या सरकारांनी आपापल्या परीने देशाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. पण आज मला कोणत्याही भ्रमात न राहता आत्मविश्वासाने सांगायचे आहे की मोदी सरकारच्या दहा वर्षात प्रत्येक क्षेत्राचा विकास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे काम केले. मोदींच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला. . त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील यात शंका नाही, असं शाह म्हणाले.