केरळमध्ये यलो अलर्ट, महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा; हवामान विभागाने सांगितली संभाव्य तारीख
केरळमध्ये आधीच अनेक भागांत मुसळधार पावसाळा सुरूवात झाली असून मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
Waiting for monsoon in Maharashtra : मागील काही दिवसांपासून देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष्य मान्सूनकडे लागले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजामुळे दिलासादायक चित्र समोर आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मौसमी वारे म्हणजेच मान्सून 26 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये आधीच अनेक भागांत मुसळधार पावसाळा सुरूवात झाली असून मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
हवामान विभागाने सांगितले की, पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरीन परिसर, पूर्व-मध्य बंगालचा उपसागर तसेच अंदमान समुद्राच्या उर्वरित भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. साधारणपणे केरळमध्ये मान्सून 1 जूनला पोहोचतो, मात्र यंदा तो काही दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, केरळमधील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 मे रोजी पथानामथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाड येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 26 मे रोजी तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर 27 आणि 28 मे रोजीही दक्षिण केरळमधील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने 28 मे ते 3 जून दरम्यान केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हैद्राबादमध्ये पोलिसांना गाडी का फोडावी लागली? माधापूर रेसिंग प्रकरणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल
दुसरीकडे, उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. राजधानी दिल्लीत पुढील तीन दिवस उष्णतेपासून कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. रविवारी महाराष्ट्रातील विदर्भ भागातील ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील सात दिवस मध्य आणि वायव्य भारतात तसेच पुढील तीन ते पाच दिवस पूर्व आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहू शकते. मात्र, 29 मेनंतर तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे. यंदा 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर 15 जूनपर्यंत मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये, तर 25 जून ते 5 जुलैदरम्यान राजस्थानमध्ये मान्सून पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.