बावनकुळे, सरनाईक अन् शिरसाट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 3 रिक्षाचालक झाले मंत्री!

  • Written By: Published:
बावनकुळे, सरनाईक अन् शिरसाट फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 3 रिक्षाचालक झाले मंत्री!

Maharashtra Cabinet 2024 : राज्यात दुसऱ्यांदा स्थापन झालेल्या महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपाच्या 19 आमदारांनी शपथ घेतली आहे तर शिवसेनेच्या वाट्याला 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 मंत्रिपदे मिळाली आहेत.

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याचबरोबर शिवसेनेचे प्रताप सरनाईक, संजय शिरसाट यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चंद्रशेखर बावनकुळे, प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) एकेकाळी रिक्षाचालक होते. रिक्षाचालक ते राज्याचे मंत्री असा प्रवास या नेत्यांनी केल्याने सध्या सोशल मीडियावर या नेत्यांबद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे देखील एकेकाळी रिक्षाचालक असल्याने सध्या सोशल मीडियावर आधी रिक्षावाला CM आणि आज 3 रिक्षावाले मंत्री असा मेसेज सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी लग्नाच्या निर्णयामुळे घरात वाद झाल्याने त्यांनी काही काळ रिक्षा चालवली होती असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना केला होता. तर प्रताप सरनाईक यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ रिक्षा चालवली होती. त्यानंतर सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि 1997 साली त्यांनी सक्रिय राजकरणामध्ये उडी घेतली. तर संजय शिरसाट सुरुवातीला रिक्षाचालक होते. बाळासाहेबांच्या विचाराने ते अत्यंत भारावले आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीत नागपूरमधील कामठी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे तर ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक जिंकून आले आहे आणि संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणून आले आहे.

भाजपकडून आज चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे आणि आकाश फुंडकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर माधुरी मिसाळ, पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेकडून आज गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराजे देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरतशेठ गोगावले आणि प्रकाश अबिटकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात अजितदादांचे 9 शिलेदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे , आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील आणि बाबासाहेब पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर इंद्रणिल नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube