अभिनेते सयाजी शिंदेंची राजकीय इनिंग, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

  • Written By: Published:
अभिनेते सयाजी शिंदेंची राजकीय इनिंग, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Sayaji Shinde join NCP : आगामी  विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता  मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

अभिनेते सयाजी शिंदेंची राजकीय इनिंग, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

सयाजी शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय, सामाजिक क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. सयाजी शिंदे राजकारणात प्रवेश करणार, अशी चर्चा अनेक वर्षांपासून सुरू होती, अखेर विधानसभा निवडणुकीपूर्वी (दि. 10 ऑक्टोबर) सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते.

पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर अजित पवारांनी मोठी जबाबदारी दिली. सयाजी शिंदेंची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत ते राज्यात स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. पक्षात त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असं यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले.

‘निर्णय बदला नाहीतर बंडखोरी परवडणार नाही’; अप्पासाहेब जगदाळेंचा थेट पवारांना इशारा 

अजित पवार काय म्हणाले? 
या पक्षप्रवेशावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की,  मी जास्त चित्रपट पाहत नाही, पण सयाजी शिंदे यांचे चित्रपट मी पाहिले आहेत. अभिनयाच्या जोरावर एक वेगळ्या प्रकारचा ठसा सयाजी शिंदेंनी उमटवला आहे, अशा शब्दात अजितदादांनी  त्यांचं कौतुक केलं. त्यांचे चित्रपट समाजात जागरुकता वाढवतात, अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी केलेत. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेमार्फत ते राज्यभर वृक्षारोपण करतात, असं अजित पवार म्हणाले.

पुढं बोलतांना अजित पवार म्हणाले, सयाजी शिंदे यांच्यावर कोणती जबाबदारी द्यावी, याबाबत आमच्यात चर्चा झाली.  त्यानुसार सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील, अशी माहिती अजितदादांनी दिली.

भुजबळ काय म्हणाले?
भुजबळ म्हणाले,  नाव जरी मराठी असलं तरी अभिनयाचा ठसा त्यांनी महाराष्ट्र आणि दक्षिण भारताच्या सिनेसृष्टीत उमटवला आहे. ते अभिनेते तर आहेतच, आता ते उद्या ते नेते सुध्दा होणार आहेत. लोकांचं दु:ख कसं कमी होईल, त्यासाठी त्यांना काम करायचं आहे. सयाची शिंदे यांनी मराठी आणि दक्षिण सिनेसृष्टीत चांगलं काम केलं. रजनीकांत आणि सयाजी यांना तिकडची भाषा कशी समजत असेल ते मलाही कळत नाही, असं भुजबळ म्हणाले.

आजपर्यंत सामाजिक बांधिलकीने त्यांनी काम केले आहे. राजकारणाचाही त्यांना अभ्यास आहे. तुमच्या येण्याने पक्षाला शक्ती मिळणार आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.

सयाजी शिंदे काय म्हणाले?

सिनेमामध्ये मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या आहेत. मात्र मी राजकारणात येईन असे कुणालाही वाटले नाही.वेळेचं भान ठेवून कामे झाल्याने दादांचा आदर वाटला. त्यामुळेच मी येत्या आठ दिवसात निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून चांगले काम करु शकतो हे वाटले. पक्षाची शिस्त आवडली. पक्षाने शेतकऱ्यांविषयी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत आणि या पक्षात मला विश्वास वाटला म्हणून प्रवेश केल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

अजित पवार गटात सयाजी शिंदे यांनी प्रवेश केल्यानंतर आता ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube