मुंबईचा जोशीमठ झाला तर… ;आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
मुंबई : ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.महापालिकेच्या तिजोरीतील पैसे वापरून रस्ते बांधले जाणार आहेत. त्यावरुन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दहा प्रश्न विचारले आहेत.
महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाला 400 किलोमीटरच्या 6 हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचा अधिकार आहे का? असा सवाल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणाले, बीएमसीतील घोटाळा बाहेर काढल्यानंतर बीएमसीने त्वरित टेंडर रद्द करायला पाहिजे होते.
वेगळे टेंडर किंवा नव्याने टेंडर दिले पाहिजे होते. महापालिकेने काढलेल्या प्रेसनोटमध्ये मी विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही.
बीएमसीमध्ये सध्या कोणतेही लोकप्रतिनिधी नाहीत. महापालिकेवर प्रशासक आहेत.आणि ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने काम करतात. त्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप आदित्या ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी पुढील दहा प्रश्न राज्य सरकारला विचारले आहेत..
1) 400 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे मागणी कोणी केली होती?
2) लोकशाहीमध्ये प्रशासकाला 400 किलोमीटरच्या 6 हजार कोटीच्या कामांना मंजुरी देता येते का?
3) 6 हजार 80 कोटी बजेटमध्ये कसे दाखवणार?
4) 400 किलोमीटरच्या रस्ते किती दिवसांत पूर्ण करणार?
5) आत्तापर्यत एक किलोमीटरचा रस्ता 10 कोटीत पूर्ण व्हायचा, आता एक किलोमीटरसाठी 17 कोटी लागणार आहेत. महापालिकेने कमी दरात कंत्राट मिळेल यासाठी प्रयत्न का केले नाहीत?
6) एसआर कोणासाठी बदलला आहे?
7) मुंबईचा जोशीमठ झाला तर याला जबाबदार कोण?
8) पाच कंत्राटदारांचा मुंबईत काम करण्याचा अनुभव काय आहे?
9) गोखले ब्रिजच्या अपघातावेळी व्हीजीटीआय आणि आयआयटीसारख्या संस्था अपात्र ठरल्या असताना आता क्वालिटी टेस्ट कशी करणार?
10) आपल्या देशात पाच कंत्राटदार राहिले आहेत का? त्यांना कंत्राट कसे मिळाले?