Ajit Pawar राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास सज्ज! पवारांसमोरच अनेकांना झापले…
मुंबई : Sharad Pawar यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर नाट्य रंगले होते. पण या सर्व नाट्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेने अजित पवार यांची भूमिका सर्वार्थाने वेगळी होती. सगळे नेते हे शरद पवार यांना राजीनामा घेण्याची विनंती करत असताना अजित पवारांचा सूर वेगळाच सांगत होता.
पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा म्हणून प्रत्येक नेता आग्रह करत होता. कार्यकर्ते घोषणा देत होते. सुप्रिया सुळे शांत बसून होत्या. कधी हसत होत्या. पवार यांच्या शेजारी प्रतिभा पवार होत्या. त्या देखील कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि भाषणे ऐकून गालात हसत होत्या. एका घोषणेवर त्यांनी डोक्यावर हात लावून हे थांबवा, असे सुचविले. प्रतिभा पवार यांच्या उजव्या हाताला अजित पवार बसले होते. त्यांच्याशी कोणताही तणाव न घेता प्रतिभा पवार बोलत होत्या. प्रतिभा पवार यांच्या मागे सुनील तटकरे उभे होते. त्यांच्याही कानात प्रतिभाताई वारंवार सांगत होत्या.
शरद पवार हे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार, याची पूर्वकल्पना अजित पवार यांना होती, असे त्यांनीच बोलून दाखविले. हा निर्णय एक मे रोजी होणार होता. पण या तारखेला वज्रमूठ सभा होणार असल्याचे तो निर्णय दोन मे रोजी म्हणजे आज जाहीर करण्याचे ठरल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले. त्यामुळे पवार यांची ही नियोजनपूर्वक योजना असल्याचे अजितदादांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
आक्रमक घोषणा देणाऱ्यांना अजित पवारांनी त्यांच्या शैलीत झापले. ये तू गप रे, तुलाच फार कळत का? असे अनेकांना म्हणत होते. ये संजय तू आता बास कर (बहुतेक संजय बनसोडे असावेत). तुम्हाला साहेबांना त्रास द्यायचा आहे, असे अजितदादा सुनावत होते.
Sharad Pawar Retirement : अजित पवार म्हणाले, “रडारड करू नका, हे कधी ना कधी होणार होतं..”
त्यांनी केलेले भाषणही शरद पवार यांचा राजीनामा आता कार्यकर्त्यांनी स्वीकारावा असाच आग्रह धरणारे होते. त्यांच्या डोळ्यादेखत पक्षाचा नवीन अध्यक्ष तयार होईल, अशी रोखठोक भूमिका अजितदादांनी मांडली. हे कधी ना कधी होणारच होते, इतक्या स्वच्छ शब्दांत अजितदादांनी कार्यकर्त्यांना आपल्या भावनांना आवर घालण्याचा एक प्रकारे दम दिला. अजितदादांच्या भूमिकेशी फक्त प्रफुल्ल पटेल सहमत होते. आम्ही कार्यकर्त्यांच्या मनानुसारच निर्णय घेऊ, असे सांगत समजूत घालण्याचा पटेल यांनी प्रयत्न केला. पण कार्यकर्ते त्यांना जुमानत नव्हते. शेवटी अजित पवार यांनीच साहेबांना आता जाऊ द्या, अशा कठोर शब्दांना सुनावले नंतर व्यासपीठावरील नाट्य संपले.
शरद पवार हे या साऱ्या गदारोळात शांत होते. सुप्रिया सुळे या देखील काही बोलल्या नाहीत. प्रतिभाकाकी स्वस्थचित्ताने हे सारे पाहत होत्या. जयंत पाटील, नरहरी झिरवळ, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले. छगन भुजबळ यांनाही भावना दाटून आल्या. तशा भावना अजित पवारांच्या दाटून आल्या नाहीत. त्यांनी एखाद्या घरातील कर्त्याप्रमाणे कधी कठोर तर कधी दम देत कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही रडारड थांबविण्यास सांगितले. एकूणच अजित पवार हे पक्षात क्रमांक दोनचे नेते मानले जातात. पण त्यांचा आजचा अविर्भाव, कठोरपणा, पवारांच्या निवृत्तीवर स्पष्टपणे मांडलेले मत हे पाहून ते आता लवकरच क्रमांक एकचे नेते होणार, याची सारी चिन्हे आज दिसून आली.