संजयकाकांच्या राजकारणावर दुसरा घाव? रोहित पाटील ‘तासगाव’साठी तयार!
असं म्हणतात की, शरद पवार (Sharad Pawar) सहसा आपले पत्ते लवकर ओपन करत नाहीत. पण या पत्त्यांवर आपण डाव जिंकू शकतो असा कॉन्फिडन्स त्यांना येतो तेव्हा ते डाव सुरु होण्याआधीच शो करुन मोकळे होतात. पुढे डाव जिंकण्याचीच त्यांना प्रतिक्षा असते. पवार यांनी तासगाव-कवठे महाकांळ विधानसभा मतदारसंघाबाबत असेच काहीसे केले आहे. पवार यांना रोहित पाटील (Rohit Patil) यांच्याबद्दल एवढा कॉन्फिडन्स आहे की, त्यांनी निवडणुकीला दोन महिने असतानाच त्यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. तेही अगदी तासगावमध्ये जाऊन, जाहीर व्यासपीठावरुन भाषण देत.
त्यामुळे आर. आर. पाटील यांचे वलय आणि तरुण असलेले रोहित पाटील हमखास निवडून येऊ शकतात, असा विश्वास पवारांना असावा. शरद पवार यांनी रोहित पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याने तासगावमधून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याचे उत्तर तर मिळाले आहे. आता प्रश्न उरतो तो रोहित पाटील यांना आव्हान कोण देऊ शकते? कोणत्या पक्षाचा उमेदवार त्यांच्या विरोधात असू शकतो? (asgaon Kavthe Mahakal Assembly Constituency, there is a fight between Rohit Patil and Prabhakar Patil)
याच प्रश्नाचे उत्तर पाहूया लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये.
तासगाव मतदारसंघातून आतापर्यंत आर. आर. पाटील सहावेळा तर सुमनताई दोनवेळा आमदार झाल्या. 1990 च्या दशकात स्वर्गीय दिनकर आबा पाटील यांचे वर्चस्व मोडित काढत आर. आर. पाटील यांनी तासगाव मतदारसंघावर मांड पक्की केली. त्यानंतर आबांना संजयकाका पाटलांचेही आव्हान मिळाले. पण ही आव्हाने मोडीत काढत आबा सतत निवडून येत गेले. 2009 मध्ये तासगाव आणि कवठे महांकाळ हे दोन वेगळे मतदारसंघ एक झाले आणि दोन्ही तालुक्यांचे राजकारणच बदलले.
आर. आर. पाटील यांच्यापुढे कवठे-महांकाळच्या अजितराव घोरपडे यांनी आव्हान उभे केले. 2014 च्या निवडणुकीत घोरपडे यांनी आबांना घाम फोडला होता. आधीच भाजपची लाट, त्या लाटेत अगदी कट्टर विरोधक असलेले संजयकाका पाटील खासदार झाले होते. त्यांच्या जोडीला अजितराव घोरपडे आले होते. त्यांनीही भाजपमधूनच निवडणूक लढवली. त्यामुळे आबांची जागा धोक्यात आहे, असे बोलले गेले. पण आबा तरले. 22 हजार मतांनी विजयी झाले. खासदारही आमचाच अन् आमदारही आमचाच असे राजकारण तासगावकरांनी सेट केले. राजकारण सेट असतानाच आर. आर. आबांचे निधन झाले. पोटनिवडणुकीत आबांच्या पत्नी सुमनताई पाटील निवडून आल्या.
Ahmednagar : जगतापांविरोधात ठाकरेंचा ‘वाघ’ शड्डू ठोकणार? ओबीसी फॅक्टरवर भिस्त
2019 मध्ये घोरपडेंनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला. तशी ती निवडणूक सुमनताईंसाठी सोपी नव्हती. ऐनवेळी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेला होता. संजय पाटील, देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजपची ताकद सेनेच्या आणि घोरपडेंच्या बाजूने उभी केली होती. पण 20-21 वर्षांच्या रोहित पाटलांनी कसलेल्या राजकारण्याला लाजवणारे नियोजन केले. सुमनताई तब्बल 61 हजार मतांनी विजयी झाल्या. तिथेच युवा रोहित यांच्या राजकीय एन्ट्रीचे बीज रोवले गेले. त्यांचे काम बघून जयंत पाटील यांनीही त्याचवेळीच पुढचे उमेदवार रोहित पाटील असतील असे जाहीर करुन टाकले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून घोरपडे यांनी आपली दिशा बदलली. यामागे संजयकाका पाटील आणि घोरपडे यांचे बिघडलेले संबंध हे कारण तर होतेच. पण दुसरे मोठे कारण होते ते प्रभाकर पाटील यांचे राजकीय लाँचिन्गचे. संजयकाका 10 वर्षे खासदार होते. जोडीला त्यांनी मुलगा प्रभाकर पाटील यांनाही विधानसभेसाठी तयार केले. प्रभाकर वर्षभरापासून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात मशागत करत आहेत. नेमकी हीच गोष्ट घोरपडेंना खटकली. संजयकाकांचे वैयक्तिक लाभाचे राजकारण असल्याचा आरोप करत घोरपडे यांनी लोकसभेला विशाल पाटील यांच्यामागे ताकद उभी केली. कवठेमहांकाळ तालुका आणि मिरज पूर्वचा भाग त्यांनी पिंजून काढला.
कार्यकर्त्यांचा कल पाहून सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या भूमिकेला बासनात गुंडाळले. घोरपडेंच्या सुरात सूर मिसळून विशाल पाटलांसाठी मोर्चेबांधणी केली. आता विशाल पाटील खासदार आहेत. घोरपडे यांनी गतवेळीच आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. ते सध्या जयंत पाटील यांच्याच मदतीने जिल्हा बँकेवर आहेत. त्यामुळे ते रोहित पाटील यांच्यामागे उभे राहण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या पक्षाला सध्या इथे फारसे अस्तित्व नाही. जयंत पाटील आणि सुमनताई पाटील या दोघांनीही शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केल्यामुळे तालुक्यात फारशी उलथा पालथ झाली नाही. एखादा मोठा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्यांच्या पक्षात गेलेले नाहीत. अजितदादांच्या अभिनंदनाचे किंवा शुभेच्छांचे फलकही भाजपचेच कार्यकर्ते लावत आहे.
Nashik : लोकसभेला हवा फिरली… विधानसभेला नाशिक भाजपच्या हातून जाणार?
राष्ट्रवादी एकसंध राहिल्याने ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता आहे. भाजपमधून आमदारकीसाठी तरुण नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील प्रयत्नशील आहेत. संजयकाका पाटलांचा पराभव झाल्याने, घोरपडेंनी साथ सोडल्याने भाजपला तासगाव आणि कवठे महांकाळ या दोन्ही तालुक्यांवर वर्चस्व ठेवण्यासाठी प्रभाकर पाटील यांच्यारुपाने चांगला पर्याय ठरु शकतो. भाजप आणि संजयकाका पाटील यांची ताकद अशा दोन्ही समीकरणांच्या आधारे ते रोहित पाटील यांना जड जाऊ शकतात, असे सध्याचे तरी चित्र दिसते. मात्र ऐनवेळी गरज पडलीच तर संजय पाटीलही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात. असे झाल्यास तासगावची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. पण संजयकाका किंवा त्यांचा पुत्र पराभूत झाल्यास त्यांच्या गटाला पुन्हा उभे रहाण्यासाठी बरेच कष्ट करावे लागू शकतात.
रोहित पाटील यांना ही निवडणूक जड जाण्याची आणखीही कारणे आहेत. यात आर. आर. पाटील यांच्या पश्चात तासगाव तालुक्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जयंत पाटील समर्थकांची संख्या लक्षणीय झाली आहे. जयंत पाटील यांना मानणारा एक स्वतंत्र गटच अलीकडच्या काळात तासगाव तालुक्यात तयार झाला आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्याने हा गट रोहित पाटील यांना कितपत मदत करतो हे बघण्यासारखे असणार आहे. याशिवाय आबांचे पुत्र रोहित पाटील हे राज्यभर व्यासपीठ गाजवत फिरत राहिले. मात्र, मतदारसंघात त्यांचा थेट संपर्क उणाच राहिला आहे, असे स्थानिक पत्रकार सांगतात. त्यांची ताकद देखील केवळ आबांची पुण्याई एवढीच आहे. यामुळे या मतदारसंघाला पर्याय हवा आहे. पण प्रभाकर पाटील ठरू शकतील का हा प्रश्नच आहे.