दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत अशोक चव्हाण हरवले; कोपर्‍यातील खुर्चीवर मिळाले स्थान

  • Written By: Published:
दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत अशोक चव्हाण हरवले; कोपर्‍यातील खुर्चीवर मिळाले स्थान

पुणे : अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी काँग्रेस सोडल्यानंतर नाना पटोले म्हणाले होते, त्यांनी मागे फिरावे, त्यांना जो मान आणि जे स्थान काँग्रेसमध्ये मिळते ते भाजपमध्ये (BJP) मिळणार नाही. कुठेतरी कोपर्‍यात किंवा पाठीमागच्या रांगेत बसावे लागेल. आज पटोलेंचे हे वाक्य खरे ठरताना दिसत आहे. पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे प्रदेश अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात अनेक दिग्गज नेत्यांच्या गर्दीत अशोक चव्हाण हरवलेले दिसले. त्यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले असले तरीही कोपर्‍यातील खुर्चीवर बसावे लागले होते. (Ashok Chavan Got a seat on the corner chair In bjp Convention)


उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते…; अमित शाहांचा घणाघात

लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह केंद्रातील आणि प्रदेश भाजपमधील अनेक दिग्गज मंत्री, आमदार, खासदार, नेते, आजी, माजी आमदार, खासदार उपस्थित आहेत.

“डोकं धरून बसू नका, विधानसभेत कसर भरून काढा”; अमित शाहांचं कार्यकर्त्यांना टॉनिक

याच अधिवेशनात पहिल्या रांगेत डावीकडून गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, विजया राहटकर, आमदार पंकजा मुंडे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शाह, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, नेते शिवप्रताप, केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार अशी आसनव्यवस्था करण्यात आली होती.

मुनगंटीवार यांच्यानंतर कोपर्‍यातील एका खुर्चीवर अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आले होते. त्यांना भाषणही करता आले नाही. हेच काँग्रेसमध्ये असताना त्यांना माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते म्हणून मानाचे पान होते. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले अशा प्रमुख नेत्यांसोबत त्यांची उठबस होती. भाषण करताना प्राधान्य होते. आता भाजपमध्ये गेल्यापासून मात्र चव्हाण यांना कोपर्‍यातील खुर्चीवर बसावे लागत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube