Badlapur : पोलिसांची भूमिका पाहून डोकं सणकतंय; जितेंद्र आव्हाडांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले
Jitendra Awhad On Badlapur Rape : बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Rape) घटनेप्रकरणी पोलिसांची भूमिका पाहून डोकं सणकतंय, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, बदलापूरमध्ये एका नामंकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीयं. या घटनेविरोधात बदलापुरकरांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी या घटनेविरोधात संतापजनक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीयं.
आपल्या ४ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार तिच्या तोंडून ऐकणं आणि गुन्ह्याची नोंद करण्यासाठी १२ तास वाट बघावी लागणं, पालकांसाठी याहून मोठं दुःख काय असू शकतं..?
बदलापूरमध्ये घडलेला प्रकार प्रचंड वेदनादायी आहे, आणि त्याहून जास्त पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा संताप..! हल्ली समोर… pic.twitter.com/baSBX3DDbe
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 20, 2024
जितेंद्र आव्हाड एक्सवर शेअर पोस्ट म्हणाले, “आपल्या ४ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार तिच्या तोंडून ऐकणं आणि गुन्ह्याची नोंद करण्यासाठी १२ तास वाट बघावी लागणं, पालकांसाठी याहून मोठं दुःख काय असू शकतं..? बदलापूरमध्ये घडलेला प्रकार प्रचंड वेदनादायी आहे, आणि त्याहून जास्त पोलिसांकडून झालेल्या दिरंगाईचा संताप..! हल्ली समोर येत असलेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांची भूमिका पाहून खरं तर आश्चर्य वाटतं आणि डोक्यात सणक जाते. आपलं पोलिस प्रशासन इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतं? मग याचा संताप होऊन लोक का नाही शहर बंद करणार?
महिलांविरोधात घडत असलेल्या घटनांवरून जबाबदारी झटकत आपले सत्ताधारी फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यात मग्न आहेत. फक्त आपली पोळी भाजण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जातोय. पण सशक्त आणि सक्षम धोरण आणून ते राबवण्याची या सरकारची कुवत नाहीये. मोठा भाऊ म्हणत आलेल्या केंद्र सरकारकडून यांनी अजून महाराष्ट्र शक्ती विधेयकही मंजूर करून घेतलं नाहीये.
बदलापूर शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; मुख्यमंत्री शिंदे अन् गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले?
माझी महामहिम @rashtrapatibhvn मुर्मू जी यांना विनंती आहे, की महाराष्ट्र शक्ती विधेयकाला संमती मिळवून द्यावी, जेणेकरून महिलांविरोधातील गुन्ह्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल, आणि राज्यात व देशात अशा गुन्ह्यांविरोधात एक उदाहारण सादर होईल” असं जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.
नेमकं काय घडलं?
बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे.
विरोधकांची संवेदना बोथट : फडणवीस
विरोधी नेते अशा घटनांमध्ये राजकीय पोळी भाजतात. विरोधकांच्या मनात केवळ राजकारण आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी असं खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. ज्यावेळी अशा संवदेनशील घटना घडतात तेव्हा राजकीय न वागता जनतेला काय दिलासा देता येईल, न्याय कसा देता येईल असं वागलं पाहिजे. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचंय, विरोधकांची संवेदना बोथट झाली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.