‘उद्धव ठाकरे सोबत असते तर…’; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
Raosaheb Danve : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला. महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकल्याने राज्यात महायुतीचीच (Mahayuti) सत्ता स्थापन होणार आहे, हे स्पष्ट झालं. मात्र, मुख्यमंत्रिपदी कोण बसणार याबाबतचा ठोस निर्णय झाला नसल्याने सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवेंनी (Raosaheb Danve) मोठं विधान केलं.
ओबीसी वाद राज्य सरकार पुरस्कृत होता, मी सुरुवातीपासून ठाम ; विकास लवांडे
ठाकरे सोबत असते तर आज मिळालेल्या बहुमतापेक्षा अधिक जास्त बहुमत मिळाले असते, असं दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे भाजप सोबत असायला हवे होते, असं म्हटलं. दानवे म्हणाले की, 2019 मध्ये आमच्या महायुतीला जवळपास 165 ते 167 जागा मिळाल्या होत्या. मात्र, तेव्हा शिवसेना संजय राऊतांच्या सांगण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली. जर शिवसेना (उद्धव ठाकरे) काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली नसती तर असा कारभार केला असतो जो पहिल्यांदा 2014 ते 2019 या कार्यकाळात झाला. त्या कारभाराच्या आधारावर आज जेवढं बहुमत मिळालं, त्यापेक्षा जास्त बहुमत मिळवत आम्ही सत्ता स्थापन केली असती, असं दानवे म्हणाले.
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रिपद मिळणार? एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं…
पुढं ते म्हणाले, महायुतीत सर्वाधिक जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे साहजिक मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल. येत्या 5 डिसेंबरला भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल, असंही दानवे म्हणाले. त्यापूर्वी विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यात नेता निवडला जाईल. त्यानंतरच मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंच्या नाराजीविषयी विचारले असता दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. ही पूर्णत: पेरलेली बातमी आहे. महायुतीत कोणताही हा वाद नाही. मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, आमचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरले आहे. पण, वरिष्ठ जोपर्यंत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत कोणाचेही नाव अधिकृतपणे जाहीर केले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ठाकरे सोबत असते तर जास्त बहुमत मिळालं असतं, या दानवेंच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. यावर आता ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.