रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना विरोध करुन ‘मोहिते पाटील-रामराजे’ तोंडावर आपटणार?

रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना विरोध करुन ‘मोहिते पाटील-रामराजे’ तोंडावर आपटणार?

भाजप रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjitsinh Naik Nimbalkar) बदलणार. भाजप रणजीतसिंहांऐवजी मोहिते पाटील किंवा रामराजेंच्या घरात तिकीट देणार. साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपचे तिकीट देऊन माढा राष्ट्रवादीला सोडणार, अशा प्रकारच्या बातम्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची माढ्यातून उमेदवारी घोषित झाल्यापासूनच मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) घराणे आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी विरोधाला सुरुवात केली आहे. आमचे कार्यकर्ते त्यांचे कामच करणार नाहीत, असा सूर आळवायला दोन्ही नेत्यांनी सुरुवात केली आहे. (Can Ranjitsinh Naik Nimbalkar’s candidature be changed due to the opposition of Vijaysinh Mohite Patil and Ramraje Naik Nimbalkar?)

मोहिते पाटील यांनी तर थेट तुतारीच चिन्ह हाती घ्यावे अशी मागणी कार्यकर्ते करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. भाजपकडून जरी उभे राहिला तरी तुम्हाला मतदान करणार नाही, असे कार्यकर्ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसून येत आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनीही नुकताच फलटणमध्ये भव्य मेळावा घेतला. यात आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांना चेतवण्याचे काम केले. याच सगळ्या घटनाक्रमामुळे माढ्यात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची घोषित केलेली उमेदवारी बदलण्याची भाजपवर नामुष्की येणार अशी चर्चा सुरु आहे. पण खरंच असे होईल का? खरंच मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधामुळे रणजीतसिंहांचे तिकीट बदलले जाऊ शकते का? या दोघांचीही तेवढी ताकद आहे का? हे बघणे महत्वाचे ठरते.

1 लाखाचे मताधिक्य म्हणजे मोहिते पाटील नाही :

रणजीतसिंहांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून एक लाखांचे मताधिक्य मिळाले होते. हेच मताधिक्य त्यांना संसदेत पोहचविण्यासाठी महत्वाचे ठरले होते. हे मताधिक्य त्यांना मोहिते पाटील यांच्यामुळे मिळाले असे बोलले गेले. पण प्रत्यक्षात स्थानिक पत्रकार मात्र वेगळेच गणित मांडतात. हे मताधिक्य एकट्या मोहिते पाटलांमुळे नव्हे तर भाजपमुळे मिळाले होते असे पत्रकार सांगतात.

2014 मध्ये भाजपच्या पाठिंब्यावरील अपक्ष अनंत खंडागळे यांना माळशिरसमध्ये विधानसभेला 70 हजार मते होती, तर शिवसेनेच्या लक्ष्मण सरवदे यांना 23 हजार. म्हणजे मोहिते पाटील भाजपमध्ये येण्यापूर्वी या मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या विचाराची 90 हजारांच्या आसपास मते होती. मोहिते पाटील भाजपमध्ये आल्यानंतर 2019 मध्ये रणजीतसिंहांना लोकसभेला इथून एक लाख 43 हजार मते मिळाली. तर राष्ट्रवादीला 42 हजार 395 मते मिळाली.

एक अकेला धनंजय चंद्रचूड क्या करेगा?

2019 मध्ये राम सातपुते यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाख तीन हजार 500 मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांना एक लाख 917 मते मिळाली. राम सातपुते केवळ 2 हजार 590 मतांनी आमदार झाले. स्थानिक पत्रकारांच्या मतानुसार, जर मोहिते पाटील फॅक्टरमुळे रणजीतसिंह निंबाळकरांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले असेल तर त्याच विधानसभा मतदारसंघात सातपुतेंना केवळ अडीच हजारांचे मताधिक्य का मिळाले?

रणजीतसिंह निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य माळशिरसमधून मिळाले, पण हे सर्वच मोहिते पाटील यांच्यामुळे मिळाले असे म्हणणे चुकीचे आहे. भाजपच्या के. के. पाटील यांच्यासारखे जुने नेते अनेक वर्षांपासून इथे काम करत आहेत. त्यांच्या प्रमाणेच मोहिते पाटील हेही मदत करणारे एक ठरले होते. यात मोहिते पाटलांचा वाटा जास्त असेल पण सगळेच मताधिक्य त्यांचे आहे असे म्हणणे चुकीचे आहे, त्यामुळेच आता मोहिते पाटील यांनी साथ दिली नाही तरी फारसा फरक पडेल असे नाही, असे ही स्थानिक पत्रकार सांगतात.

स्थानिक आमदारांची आणि वेगवेगळ्या गटांची काय भूमिका?

रणजीतसिंह यांनी मागच्या वर्षभरामध्ये मतदारसंघांत कमालीच्या जोडण्या लावल्या आहेत. यात त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय शिंदे, बबन शिंदे या आमदारांना आपल्याबाजूने आणले आहे. जे नारायण पाटील आणि जयवंतराव जगताप मोहिते पाटलांच्या जवळचे समजले जायचे तेही आता रणजीतसिंहांच्या बाजूने उभे आहेत. शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील, बागल घराणे हेही रणजीतसिंहांसोबत आहेत.

के. कवितांनी एक वाक्य सांगताच केजरीवालांना ED नं उचललं, साऊथ लॉबीशी नेमकं कनेक्शन काय?

उत्तमराव जानकर जे 2019 मध्ये विधानसभेला राष्ट्रवादीतून उभे होते ते देखील आता अजितदादांसोबत असून ते भाजपच्या वाटेवर आहेत. हे सर्व जण मोहिते पाटील नको म्हणून रणजीतसिंहांसोबत आहेत. याशिवाय जयकुमार गोरे, राम सातपुते अशा भाजपच्या आमदारांची देखील ताकद रणजीतसिंह यांच्यासोबतच आहे. थोडक्यात संजय शिंदे, बबन शिंदे, शहाजीबापू पाटील, राम सातपुते आणि जयकुमार गोरे हे पाच आमदार आणि नारायण पाटील, बागल हे माजी आमदार रणजीतसिंहांसोबत आहेत.

दुसऱ्या बाजूला जे रामराजे रणजीतसिंहांना विरोध करतात त्या रामराजेंच्या फलटणमधूनच गत लोकसभेला रणजीतसिंहांनी मताधिक्य मिळविले होते. हेच मताधिक्य कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहेत. इतकेच नाही तर स्वतः अजित पवार यांनीही रणजीतसिंह नाईक निंबाळकर निवडून आले पाहिजेत म्हणून कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळेच मग आता रामराजेंनी विरोध केला तरी असा काय फारसा फरक पडणार आहे? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळेच रणजतीसिंह यांचे तिकीट बदलण्याची शक्यता कमीच आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube