Ajit Pawar : ‘कायद्याच्या चौकटीत टिकणारंच आरक्षण दिलं पाहिजे’; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकारणातही सध्या याच मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. आता याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, दिलेलं आरक्षण कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत टिकलं पाहिजे. सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. अजित पवार यांनी आज माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे त्यांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षण आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
प्रत्येकाला आपल्या समाजासाठी आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. यात कोणतंही दुमत नाही. पण आरक्षण देताना ते कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत टिकलं पाहिजे. याआधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. त्यावेळी आम्ही मंत्रिमंडळात होतो. परंतु, दुर्दैवाने ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं नाही. त्यानंतर फडणवीसांचं सरकार आलं. त्यांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं. उच्च न्यायालयात टिकलं पण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही.
Maratha Reservation: विरोध करून उलट्या बोंबा मारू नका; बच्चू कडूंनी भुजबळांना डिवचले !
अलीकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण रोज कुणीतरी काहीतरी वक्तव्य करतो. कुणी आरे म्हटलं की दुसऱ्यानं कारे म्हणायचं हे यशवंतराव चव्हाण यांनी कधीच शिकवलं नाही. ही राज्याची संस्कृतीही नाही. मला कुणाला टोकायचं नाही पण माझ्यासकट सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.