“वस्तुस्थिती समजल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल”, शिंदेंनी सांगितलं नेमकं काय करणार?

“वस्तुस्थिती समजल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल”, शिंदेंनी सांगितलं नेमकं काय करणार?

Eknath Shinde on Chhagan Bhujbal : राज्य सरकारने काल मराठा समाजाच्या (Maratha Reservation) अनुषंगाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आता आणखी सोपे होणार आहे. या संदर्भात सरकारने तातडीने एक जीआरही काढला आहे. परंतु, हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे अशी भावना तयार होऊ लागली आहे. याची सुरुवात ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रियांनी झाली.

आज तर राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) थेट आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकला आणि आपली नाराजी स्पष्ट दाखवून दिली. या प्रकाराने महायुती सरकारमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण होऊ लागली. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) भाष्य केलं आहे. वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल असे शिंदे म्हणाले आहेत.

छगन भुजबळ आक्रमक; कागदपत्रे दाखवत म्हणाले ‘…म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही’

नेमकं काय घडलं होतं

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. काल राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेटबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. या निर्णयामुळे ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली आहे. राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच त्यांनी बहिष्कार टाकला. इतकेच नाहीतर सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराही भुजबळ यांनी दिला.

भुजबळांची नाराजी दूर होईल 

भुजबळांच्या या नाराजीसंबंधी पत्रकारांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता शिंदे म्हणाले, आम्ही त्यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री देखील त्यांच्याशी बोलतील. आपण जो काही निर्णय घेतला आहे त्याची जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांना समजावून सांगू. यानंतर सरकारने घेतलेला निर्णय त्याची माहिती आणि वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होईल.

मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू; प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube